SSC result दहावीचा निकाल 99.95 टक्के , निकालात यंदाही कोकण विभाग आणि विद्यार्थिनींनी मारली बाजी

दहावीच्या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी जाहीर केला.  यंदा तब्बल 99.95 टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे विद्यार्थिनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेत 99.96 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत तर  99.94 टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. निकालावर विभागवार नजर टाकल्यास यंदाही कोकण विभागाने निकालात बाजी मारली असून या विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला असून या विभागाचा निकाल 99.84 टक्के इतका लागला आहे.

निकालाची वैशिष्ट्ये

  • 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण
  • 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले
  • 83262 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण
  • 27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे
  • 22384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला
  • दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 टक्के लागला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल 16 जुलै, 2021 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. निकाल जाहीर करण्यापूर्वी या निकालाची ठळक वैशिष्ट्ये सांगण्यासाठी सकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

कोरोनामुळे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकटपणे पास करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 10 जूनपासून विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाला सुरुवात झाली. मूल्यमापन आणि निकाल तयार करण्याचे काम 3 जुलैपर्यंत पूर्ण करून दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर करण्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले होते, परंतु ही डेडलाइन मंडळाला पाळता आली नाही. त्यामुळे दहावीचा निकाल एक दिवस लांबणीवर पडला.

आपली प्रतिक्रिया द्या