10th Result – राज्यात सिंधुदुर्ग नंबर वन! दहावीचा निकाल घटला; 93.83 टक्के

राज्याचा दहावीचा एकूण निकाल 93.83 टक्के इतका लागला आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा निकाल 1 ते 3 टक्क्यांनी घसरला आहे. या निकालात सिंधुदुर्ग जिल्हा नंबर वन ठरला असून या जिह्यातील तब्बल 98.54 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दुसरा क्रमांक रत्नागिरी जिह्याने (97.90 टक्के) पटकावला असून कोल्हापूर जिल्हा 97.21 टक्केवारीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. यंदाच्या निकालात लातूर पॅटर्नची विशेष चर्चा झाली. लातूर विभागातील तब्बल 108 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. राज्यात 100 टक्के गुण मिळालेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 151 एवढी आहे.

राज्यातील 15 लाख 29 हजार 96 विद्यार्थ्यांपैकी दहावीच्या परीक्षेत 14 लाख 34 हजार 898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 98.11 टक्के इतका लागला आहे, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 92.05 टक्के इतका लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 3.82 टक्क्यांनी अधिक आहे. परीक्षेत 95.87 टक्के मुली, तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली असून 8 हजार 312 विद्यार्थ्यांपैकी 7 हजार 688 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी 92.49 टक्के इतकी आहे.

निकालाची वैशिष्टय़े

एकूण 67 विषयांपैकी 25 विषयांचा 100 टक्के निकाल.

36 हजार 648 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी 22 हजार 320 विद्यार्थी उत्तीर्ण.

17 नंबरचा अर्ज भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा 74.25 टक्के निकाल.

33 हजार 303 विद्यार्थ्यांना एटीकेटीद्वारे अकरावीत प्रवेश.

राज्यातील 43 शाळांचा शून्य टक्के, तर 6 हजार 844 शाळांचा 100 टक्के निकाल.

परीक्षेतील गैरप्रकार एकूण 366, त्यांपैकी 166 कॉपी, शिक्षकांचे सहाय्य 2, अन्य प्रकार 248.

कोकण               98.11

कोल्हापूर            96.73

पुणे                   95.64

मुंबई                  93.66

छत्रपती संभाजीनगर  93.23

अमरावती           93.22

लातूर                92.67

नाशिक              92.22

नागपूर               92.05