दहावी परिक्षेत कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा, विभागाचा निकाल 96.22 टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. राज्यात कोल्हापूर, सांगली व सातारा जिह्यांचा समावेश असलेला कोल्हापूर विभाग दुसरा आला आहे. कोल्हापूर विभागाचा एकूण निकाल 96.22 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या विभागाच्या निकालात 0.91 घट झाली आहे.

कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्हा 97.21 टक्के गुणांसह प्रथम आला असून, सातारा जिल्हा 96.72 टक्क्यांसह दुसऱयास्थानी, तर सांगली जिल्हा 96.08 टक्के गुणांसह तिसऱया स्थानावर राहिला.

कोल्हापूर विभागातील कोल्हापूर (932), सांगली (651) आणि सातारा (733) अशा एकूण 2 हजार 316 माध्यमिक शाळांतील 355 परिक्षा केंद्रावर परीक्षा दिलेल्या एकूण 1 लाख 28 हजार 503 पैकी 1 लाख 24 हजार 312 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 69 हजार 421 मुलांपैकी 66 हजार 496 मुले उत्तीर्ण झाली. एकूण 95.69 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. तर 59 हजार 12 मुलींपैकी 57 हजार 816 मुली उत्तीर्ण झाल्या. एकूण 97.97 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 2.28 टक्के अधिक आहे.

कॉपीप्रकरणी पाचजणांवर कारवाई

यंदा कॉपीमुक्त परिक्षा अभियानांतर्गत राज्यभर परिक्षा केंद्रावर जमावबंदीचे कलम पुकारण्यात आले होते. तरीसुद्धा यंदा कॉपीचे पाच गैरप्रकार आढळले. गेल्यावर्षी 11 गैरप्रकार आढळले होते. यावेळी सातारा वगळता कोल्हापूर -2 आणि सांगली जिह्यात 3 कॉपीचे प्रकार आढळले. या पाच जणांवर त्या विषयांची परीक्षा रद्द करण्याची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हानिहाय उत्तीर्णतेचे प्रमाण

कोल्हापूर : मुले : 69 हजार 491 पैकी 66 हजार 496 उत्तीर्ण (97.97 टक्के.) मुली : 59 हजार 12 पैकी 57 हजार 816 उत्तीर्ण (96.73 टक्के).
सातारा : मुले : 19 हजार 224 पैकी 19 हजार 65 उत्तीर्ण (95.68 टक्के). मुली : 17 हजार 887 पैकी 17 हजार 502 उत्तीण (97.88 टक्के).
सांगली : मुले : 20 हजार 377 पैकी 19 हजार 255 उत्तीर्ण (94.67 टक्के), मुली : 17 हजार 429 पैकी 17 हजार 33 उत्तीर्ण (97.72 टक्के).

रिपीटर उत्तीर्णतेत कोल्हापूर प्रथम

रिपीटर विद्यार्थ्यांच्या निकालातही कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर विभागात आघाडीवर राहिला. कोल्हापूर जिह्यात 594 पैकी 387 रिपीटर विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सांगली जिह्यात 478 पैकी 250, तर सातारा जिह्यात 544 पैकी 345 रिपीटर उत्तीर्ण झाले. यामध्ये कोल्हापूर (65.15 टक्के), सांगली (52.30), तर सातारा (63.41 टक्के) अशी टक्केवारी दिसून आली.

सातारा जिल्ह्यात मुलीच सरस

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2023मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सातारा जिह्याचा निकाल 96.72 टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागात जिह्याने दुसरा क्रमांक पटकावला असून, याहीवेळी उत्तीर्णांमध्ये मुलांपेक्षा मुलींचाच टक्का अधिक राहिला आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत निकाल 0.91 टक्क्यांनी घटला आहे.

सातारा जिह्यात माध्यमिक शाळांची संख्या 733 असून, दहावीसाठी 116 परीक्षा केंद्रे होती. जिह्यातील 37 हजार 811 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 36 हजार 574 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण 97.88 टक्के, तर मुलांचे प्रमाण 95.68 टक्के आहे. मुलींचे प्रमाण 2.20 टक्क्यांनी जास्त आहे. रिपीटर म्हणून परीक्षेला बसलेल्या 544 विद्यार्थ्यांपैकी 345 (63.41 टक्के) जण उत्तीर्ण झाले आहेत.

गुण पडताळणीसाठी 12 जूनपर्यंत मुदत

ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेबाबत गुणपडताळणी करायची आहे, त्यांना 3 जून ते 12 जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येईल. याशिवाय विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी 3 जून ते 22 जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत राहणार आहे.

पुणे विभागात सोलापूर अव्वल, जिल्ह्याचा निकाल 96.6 टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 10वी परीक्षेत सोलापूर जिह्याचा निकाल 96.6 टक्के लागला आहे. एकूण 62 हजार 802 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील 60 हजार 328 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिह्यातील तीन तालुक्यांचा निकाल 97 टक्के लागला असून, 12वीप्रमाणे 10 वीच्या मुलींनी यंदाही उत्तीर्ण होण्यात बाजी मारली आहे. दरम्यान, सोलापूर जिह्यातील 356 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

सोलापूर जिल्ह्यात 10 वी परीक्षेसाठी 63,296 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील 62,802 विद्यार्थी परीक्षेस बसले, तर 60,328 विद्यार्थी उत्तीर्ण (96.06 टक्के) झाले आहेत. या परीक्षेसाठी 34 हजार 33 मुलांपैकी 32 हजार 209 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्याचे शेकडा प्रमाण 94.62 टक्के आहे, तर 28 हजार 769 मुलींपैकी 28 हजार 119 मुली उत्तीर्ण झाल्या असून, तो निकाल 97.74 टक्के इतका आहे. एकूण गुणवत्तेत 23 हजार 642 प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी 11 हजार 695, तर उत्तीर्ण श्रेणीत 2 हजार 267 विद्यार्थी आहेत.

दहावीच्या परीक्षेसाठी रिपीटर विद्यार्थ्यांची संख्या 1170 पैकी 824 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल 70.42 टक्के इतका लागला आहे. सोलापूर जिह्यातील सांगोला, बार्शी, मोहोळ या तीन तालुक्यांचा निकाल 97 टक्के इतका लागला आहे.

तालुकानिहाय निकाल

अक्कलकोट : 95.25 टक्के, बार्शी 97.25, करमाळा 93.55, माढा 96.28, माळशिरस 95.50, मंगळवेढा 96.56, मोहोळ 97.23, पंढरपूर 96.41, सांगोला 97.34, सोलापूर शहर 95.67 टक्के.

356 शाळा शंभर नंबरी

सोलापूर जिह्यातील 356 शाळा शंभर नंबरी ठरल्या असून, यामध्ये सोलापूर शहरातील 86 शाळांचा समावेश आहे. अक्कलकोट तालुक्यातील 20, बार्शी 69, करमाळा 15, माढा 39, माळशिरस 15, मंगळवेढा 27, मोहोळ 28, पंढरपूर 30, सांगोला 28 आणि सोलापूर 85 याप्रमाणे शाळांचा समावेश आहे.

सांगली जिह्यातील 264 शाळा ‘शंभरी नंबरी’

दहावीच्या परीक्षेचा सांगली जिह्याचा निकाल 96.08 टक्के लागला. यंदा दहावीच्या निकालात दोन टक्क्यांनी घट झाली. उत्तीर्णामध्ये मुलींचे सर्वाधिक 97.72 टक्के प्रमाण आहे. जिह्यात कडेगाव तालुका अव्वल ठरला असून, तालुक्याचा निकाल 98.74 टक्के लागला. सर्वांत कमी निकाल जत तालुक्याचा 95.30टक्के लागला. जिह्यातील 264 शाळा शंभर नंबरी ठरल्या आहेत.

कोल्हापूर विभागात सांगली जिल्हा तिसऱ्या स्थानी राहिला. जिह्यात 37 हजार 999 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यामधून 37 हजार 766 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते, त्यापैकी 36 हजार 288 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही बारावीनंतर दहावीच्या निकालातही पुन्हा मुलींनीच बाजी मारल्याचे स्पष्ट झाले. 17 हजार 539 मुलींनी परीक्षेचा अर्ज भरला होता, त्यापैकी 17 हजार 429 मुलींनी परीक्षा दिली, त्यामधून 17 हजार 33 जणी उत्तीर्ण झाल्या, त्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे. जिह्यातील 20 हजार 460 मुलांनी परीक्षेचा अर्ज भरला होता. त्यापैकी 20 हजार 337 मुलांनी परीक्षा दिली, त्यामधून 19 हजार 255 जण उत्तीर्ण झाले. मुलांचे पास होण्याचे टक्केवारी 94.67 टक्के आहे.

सांगली जिह्यातील 264 शाळांचा दहावी परीक्षेच्या निकाल 100 टक्के लागला आहे. वाळवा 46, आटपाडी 19, जत 30, कडेगाव 17, कवठेमहांकाळ 17, खानापूर 22, मिरज 30, पलूस 20, शिराळा 24, तासगाव तालुक्यातील 13 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. सांगली महापालिका क्षेत्रातील 26 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.

कडेगाव तालुका ठरला अव्वल

सांगली जिह्यात कडेगाव तालुक्याचा निकाल 98.74 टक्के लागला. जत 95.30 टक्के, आटपाडी 96.43, कवठेमहांकाळ 95.84, खानापूर 96.56, मिरज 95.59, पलूस 98.07, सांगली शहर 94.32, शिराळा 97.59, तासगाव 96.52 आणि वाळव्याचा 96.78 टक्के निकाल लागला.

नगर जिल्हा 94.48 टक्के, मुलांपेक्षा मुलीच सरस

दहावी परीक्षेत नगर जिह्याचा निकाल 94.48 टक्के लागला आहे. पुणे विभागात नगर जिल्हा दुसऱयास्थानी राहिला. जिह्यात बारावीप्रमाणेच दहावीतही मुलीच सरस असल्याचे दिसून आले.

दहावी परीक्षेसाठी नगर जिह्यातून 68 हजार 371 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यामध्ये 67 हजार 874 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. एकूण 64 हजार 132 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी 94.48 इतकी आहे. नगर जिह्यातील उत्तीर्ण 64 हजार 132 विद्यार्थ्यांमध्ये 21 हजार 836 विद्यार्थी उच्चश्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. तर 24 हजार 423 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, 14 हजार 292 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळविली आहे. 3 हजार 581 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुली उत्तीर्ण होण्याची जिह्याची टक्केवारी 96.62 असून मुलांची 92.79 टक्के आहे.

तालुकानिहाय निकाल टक्केवारी

अकोले 95.60 टक्के, जामखेड 94.68, कर्जत 95.56, कोरपगांव 93, नगर 95.57, नेवासा 93.75, पारनेर 95.72, पाथर्डी 91.71, राहाता 92.97, राहुरी 92.72, संगमनेर 95.33, शेवगांव 96.50, श्रीगोंदा 96.72, श्रीरामपूर 92.45 टक्के.