मतदानाच्या तोंडावर स्वाभिमानला दणका, जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

सामना प्रतिनिधी रत्नागिरी

मतदानासाठी एक दिवस बाकी असताना शिवसेनेने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला जोरदार झटका दिला आहे. स्वाभिमान पक्षाच्या जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यासर्व पदाधिकाऱ्यांना शिवबंधन बांधून महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. आजच्या पक्षप्रवेशानंतर चिपळूण तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली असून मतदानाच्या तोंडावरच स्वाभिमान पक्षाला मोठा फटका बसला आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे,महिला जिल्हाध्यक्षा मेघना शिंदे,स्वाभिमान कातकरी समाज जिल्हाध्यक्ष विलास निकम, स्वाभिमान गुहागर तालुकाध्यक्ष राजेंद्र साळवी, खेड तालुकाध्यक्ष सचिन घाडगे,गुहागरच्या महिला तालुकाध्यक्ष दिप्ती चव्हाण,गुहागर तालुका उपाध्यक्ष विलास जाधव, चिपळूण तालुका उपाध्यक्ष विश्वनाथ शेट्ये, खुडदे गावचे सरपंच प्रकाश निवाथे, रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र साळवी,नांदिवसेचे विभागप्रमुख राजेंद्र शिंदे, आदिवासी समाज चिपळूण तालुकाध्यक्ष शशिकांत निकम, वेळणेश्वर विभागप्रमुख दीपक चव्हाण, युवक जिल्हा उपाध्यक्ष कपील काताळकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष मनोज पवार, शशिकांत शिंदे आणि निता निकम यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यासर्वांचे महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेत स्वागत केले. स्वाभिमानचे युवक जिल्हा अध्यक्ष वैभव वीरकर यांनी भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हासंपर्क प्रमुख सुधीर शिंदे, महिला संपर्कप्रमुख वर्षा पितळे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, आमदार सदानंद चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम तालुकाप्रमुख प्रताप शिंदे उपस्थित होते.

बघून घेऊची भाषा- मंगेश शिंदे
मी नारायण राणेंच्या प्रेमा खातर त्यांच्या सोबत गेलो होतो. मात्र गेले पंधरा दिवस प्रचारात आम्ही आहोत स्वाभिमानचे उमेदवार नीलेश राणे यांनी आमच्याशी एकदाही संपर्क केला नाही.आम्हाला त्यांच्याशी बोलायचे असेल तर त्यांच्या पगारी नोकरांसोबत संपर्क करावा लागतो.ते आम्हाला सांगतात 236 तारीख तुम्हारी है और 24 तारीख हमारी है. अशा शब्दात धमक्या देतात आता मी पक्ष प्रवेश करणार त्यावेळी त्यांनी मला फोन करून बघून घेऊ अशी धमकी दिली.मी इतकी वर्ष राणेंसोबत आहे माझ्या विभागात पाच पैशाचे काम झालेले नाही असा आरोप मंगेश शिंदे यांनी करताना आमची काय ताकद आहे ते लवकरच कळेल मी इथे काही त्यावर बोलणार नाही. आजपासून आमचा पाठींबा विनायक राऊत यांना असल्याचे त्यांनी सांगितले.