रस्ते अपघातात महाराष्ट्र राज्य चॉकबॉल संघाचा खेळाडू ठार

सामना प्रतिनिधी । जयसिंगपूर

जयसिंगपूर-दानोळी मार्गावरील हनुमाणनगर जवळील रेणुका इंडस्ट्रीज समोर रस्त्यावर भरधाव ओमानी कारने समोरून येणाऱ्या मोटारसायलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कवठेसार (ता. शिरोळ) येथील महाराष्ट्र राज्य चॉकबॉल संघाचा खेळाडू ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. विवेक उर्फ विकी विलास बंडगर (१९) असे ठार झालेल्या खेळाडूचे नाव आहे, तर कारचालक नारायण तमन्ना चव्हाण (३२) असे जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलिसातून दिलेल्या माहितीनुसार, अपघातात ठार झालेला विवेक आपली कावासाकी बॉक्सर क्र.( MH-09 AA 5473) वरून कवठेसारकडे निघाला होता. तो जैनापूर येथील हनुमाननगर येथील रेणुका इंडस्ट्रीजजवळ आल्यावर समोरुन दानोळीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती ओमनी कार क्र. ( MH 09 AK 8115) ने जोरदार धडक दिल्याने विवेक बंडगर यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली.जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. तथापी गंभीर जखमी विवेक बंडगर याचा वाटेतच उपचारापूर्वी मृत्यू झाला.

अपघातात ठार झालेला विवेक उर्फ विकी बंडगर हा महाराष्ट्रच्या चॉकबॉल संघातील खेळाडू होता. त्याच्या खेळीने राज्य संघाने अनेक सामन्यात प्रथम क्रमांक पटकावून राष्टीय पातळीवरील सामन्याकरिता धडक मारली होती. नुकत्याच जयसिंगपुरात झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्हा संघाने पहिला क्रमांक पाटकावला होता. त्याच्या अपघाती मृत्यूने चॉकबॉल खेळात मोठी दरी निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या