धरणातील पाणीसाठय़ात 12 दिवसांत 11 टक्क्यांनी घट, टँकरची संख्या दुपटीने वाढली

राज्यातील उष्णतेच्या लाटेमुळे धरणांमधील पाण्याची पातळी झपाटय़ाने खालावत चालली आहे. मागील बारा ते तेरा दिवसांत धरणातील पाणीसाठा 11 टक्क्यांनी घटला आहे. आजच्या घडीला राज्यातल्या धरणातील पाणीसाठा 46.22 टक्क्यांवर आला आहे. वीज निर्मितीची भिस्त असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 5.71 टक्क्यांनी घटून 34.29 टक्क्यांवर आला आहे. राज्यातील पाण्याच्या टँकरची संख्या दुपटीने वाढली आहे.

या वर्षी उन्हाळ्याची अतिशय तीव्र लाट आहे. त्याचा परिणाम धरणातल्या पाणीसाठय़ावर दिसू लागला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार 15 एप्रिल रोजी राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा 58.66 टक्के होता. पण आजच्या ताज्या आकडेवारीनुसार धरणातला पाणीसाठा 46.22 टक्के आहे. मागील बारा-तेरा दिवसांत धरणातील पाणीसाठय़ात 11.78 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. कोयना धरणातील पाणीसाठा 40.78 टक्क्यांवरून 34.29 टक्क्यांवर आला आहे. केंद्र सरकार कोळशाचा पुरवठा करीत नसल्याने आधीच राज्यावर भारनियमनाचे संकट आले आहे. त्यातच कोयना धरणातील पाणीसाठा घटत चालल्याने चिंतचे वातावरण निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे.

टँकरची वाढती संख्या

एकीकडे पाणीसाठय़ात घट होत असताना दुसरीकडे टँकरची संख्या वाढत आहे. पाणीसाठा कमी होत चालल्याने टँकरच्या पाण्यावर तहान भागवणाऱया वाडय़ा-वस्त्यांची संख्या राज्यात आणि खास करून ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, पुणे जिह्यात वाढत आहे. मागील आठवडय़ात टँकरची संख्या फक्त 58 होती. पण हा आकडा आता 113वर गेला आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात 132 टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जात होता, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दिली.