वरुणराजा गुरुवारपासून विश्रांती घेणार; हवामान खात्याच्या अंदाजाने बळीराजाला दिलासा

राज्यात मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या मुसळधार पावासाने प्रचंड नुकसान केले आहे. शेतीलाही या पावसाचा मोठा फटका बसला. हवामान खात्याने बुधवारपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर गुरुवारपासून सुमारे आठवडाभर पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या या अंदाजाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्याच्या अनेक भागात रिमझिम पावसाच्या सरी बसरत आहे. तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर कोकण, मुंबई आणि उपनगर, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात काही ठिकाणी बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, गुरुवारपासून राज्यात वरुणराजा सुमारे आठवडाभर विश्रांती घेण्याची शक्यता आहे. आठवड्याभरानंतर राज्यात काही ठिकाणी रिमझिम पावासाची शक्यता आहे. तर 27 तारखेपासून पुन्हा राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुसळधार पावसाने शेतीला मोठा फटका बसल्याने वरुणराजा शांता होण्याची शेतकरी वाट बघत आहे. गुरुवारपासून सुमारे आठवडाभर पाऊस विश्रांती घेणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.