आता 5 दिवसात मुसळधार कोसळणार; मुंबई, ठाण्यासह विदर्भात यलो अलर्ट जारी

उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मॉन्सूनच्या सरी बरसायला लागल्याने दिलासा मिळाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात शनिवारी रात्रीपासून रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या आहे. या पावसाच्या शिडकाव्यामुळे वातावारणात गारवा पसरला आहे. तसेच तापमानाचा वाढलेला पाराही खाली आला आहे. सोमवारी मुंबई, उपनगर, ठाणे परिसरात ढगाळ वातावरण होते. आता पुढील पाच दिवस मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भात मुसळधार पवासाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मान्सूनने राज्यात 6 जूनला प्रवेश केला. त्यानंतर शनिवारी मान्सूनचे मुंबईत आगमन झाले. रविवारी संध्याकाळपासून मुंबई, ठाणे आणि आजुबाजूच्या परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. आता पुढील पाच दिवस मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच वातावरण ढगाळ राहणार आहे.

पावसाने मुंबई, ठाण्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दमदार बॅटिंग केली आहे. कोकणात मुसळधार पावसाने काही ठिकाणी पाणी साचले होते. पुण्यातही पहिल्याचा पावसात सर्वत्र पाणी झाले होते. या पावसाने बळीराजा सुखावला आहे. अजूनही काही जिल्ह्यात पावसाच्या सरींची प्रतीक्षा आहे. मॉन्सूनने मध्य महाराष्ट्रातून आगेकूच सुरू केली असून येत्या आठवड्याभरात तो महाराष्ट्र व्यापणार आहे.