महाराष्ट्राला राष्ट्रीय चॅम्पियन बनवणार!

25

जयेंद्र लोंढे । मुंबई

पहिल्यांदाच महिलांच्या सीनियर राष्ट्रीय स्पर्धेत खेळल्यानंतर थेट हिंदुस्थानच्या संघात सहभागी होणारी… वयाच्या २०व्या वर्षी वर्ल्ड कप जिंकणाऱया हिंदुस्थानी संघात असणारी… अन् राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुण्याची मक्तेदारी मोडून काढणाऱया मुंबई उपनगरची कर्णधार… ही स्तुतिसुमने वांद्रे येथे वास्तव्य करणाऱया सायली जाधवसाठी. आता या मराठमोळय़ा कन्येच्या खांद्यावर महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. याप्रसंगी दैनिक ‘सामना’ने तिच्याशी संवाद साधला असता ती म्हणाली, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील रेल्वेची मक्तेदारी मोडून काढत महाराष्ट्राचा झेंडा दिमाखात फडकवण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.

हरयाणाला हरवण्यासाठी शक्कल

रेल्वेच्या मुलींनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत वर्चस्व प्रस्थापित केले असले तरी आम्हाला हरयाणाकडून सातत्याने पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे कराड येथे झालेल्या सराव शिबिरात आम्ही त्या लढतींच्या व्हिडीओ क्लिप बघितल्या. आमच्या कमकुवत बाजूंवर मेहनत घेतली आहे. हरयाणाला हरवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे सायली जाधव ठामपणे सांगते.

सीनियर्सची साथ

माझ्याकडे मुंबई उपनगर संघाचे नेतृत्व होते आणि आता हिंदुस्थानी संघाची जबाबदारीही माझ्याकडे सोपवण्यात आली आहे. यावेळी मात्र अभिलाषा म्हात्रे, सुवर्णा बारटक्के, स्नेहल शिंदे या सीनियर खेळाडूंचा मला मोलाचा मला सपोर्ट लाभत आहे. कबड्डी हा सांघिक खेळ असल्यामुळे सर्वांनीच एकजूट होऊन खेळायला हवे, असे सायली जाधव यावेळी आवर्जून नमूद करते.

वडील उदय जाधव व बहीण मीनल कबड्डीपटू असल्यामुळे घरातूनच कबड्डीचे बाळकडू मला मिळाले. वडील आरटीओमध्ये कामाला असून बहीण पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत आहे. गांधी विद्यामंदिरात कबड्डीची बाराखडी शिकता आली. रोप मल्लखांब करीत असताना सुहास जोशी सरांनी माझ्यातील कबड्डीचे गुण हेरले. दहावीमध्ये ८५ टक्के तर बारावीमध्ये ७६ टक्के मिळवल्यानंतर आता टीवायबीबीआयचे शिक्षण घेत आहे,

राजेश ढमढेरे अव्वल दर्जाचे प्रशिक्षक

महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला या वर्षी राजेश ढमढेरे या अव्वल दर्जाच्या प्रशिक्षकांचा परीसस्पर्श लाभला आहे. राजमाता जिजाऊ या महाराष्ट्रातील तगडय़ा संघाला त्यांचे मार्गदर्शन मिळत असल्यामुळे आगामी मानाच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाकडून जेतेपदाची आस बाळगली जाईल. आम्ही तमाम कबड्डीप्रेमींचा विश्वास सार्थ ठरवू, असे सायली जाधव स्पष्टपणे सांगते.

ही तर फक्त सुरुवात

लहान वयामध्ये मला महाराष्ट्र व हिंदुस्थानसाठी खेळता आले. स्वत:ला भाग्यवान समजते, पण ही तर नुसती सुरुवात आहे. आता राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला जिंकून द्यायचे आहे. तसेच हिंदुस्थानसाठी खूप काळ खेळायचे आहे. ऑलिम्पिकमध्ये कबड्डीला स्थान मिळाल्यास त्यामध्ये चमकदार कामगिरी करायची आहे असे ती म्हणाली.

 

आपली प्रतिक्रिया द्या