अनिल राठोड यांच्यासाठी दिलीप गांधींचा प्रचार, दोघांच्या मनोमिलनामुळे विरोधक गर्भगळीत

सगळे मतभेद दूर सारत भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी आणि महायुतीचे नगर मतदारसंघातील उमेदवार अनिल राठोड एकत्र आले आहेत. त्यांना एकत्र आल्याचे पाहिल्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भाजप युतीचा विजय असो या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. या दोन नेत्यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक नगरमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दोघांनी त्यांच्यातील मतभेद हे पेल्यातील वादळ होते असे सांगितले.

महायुतीच्या बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अनिल राठोड यांनी शिवसेना आणि भाजपने एक दिलाने काम केल्यास कोणतीगी गोष्ट अशक्य नाही असे म्हटले. हे दोन्ही पक्ष एकत्र असल्यास मीच काय कोणीही निवडून येईल असेही ते म्हणाले. दिलीप गांधी आणि आपण एकत्र आलो असून त्यांची साथ असल्याने सगळेजण चार तासांमध्ये चार दिवसाचे काम करू शकतो असे राठोड म्हणाले. पाच वर्षांमध्ये नगरची प्रतिमा धुळीला मिळाली असून केडगाव हत्याकांडामुळे नगरची प्रचंड बदनामी झाली आहे. हे चित्र बदलायचे असल्याचे मत फक्त अनिल राठोडच नाही तर सगळ्या उपस्थितांनी मांडले.

माजी खासदार दिलीप गांधी यांनी या बैठकीत बोलताना सांगितले ‘की देर आए पर पर दुरुस्त आए’. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे असून त्यांना या पदावर बसवण्यासाठी आणि अनिल राठोड यांना आमदार करण्यासाठी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकत्रित काम करतील. आपला विजय निश्चित असून राठोड यांनी नगर शहरातील विकासाचा अजेंडा पुढे न्यावा असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले. या बैठकीला शहर प्रमुख दिलीप सातपुते ,नगरसेवक अमोल येवले, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी विक्रम राठोड, राजेंद्र राठोड, भाजपाचे किशोर डागवाले, सुवेंद्र गांधी, श्रीकांत साठे ,दत्ता जाधव श्याम नळकांडे हरिभाऊ डोळसे, प्रशांत पाथरकर, संभाजी कदम, आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या