गुजरातींनाही आवडतो कोकणातल्या भाषांचा गोडवा, हास्य जत्रेच्या ‘या’ कलाकाराने सांगितला किस्सा

>> रश्मी पाटकर – फडके

कोरोनाच्या कठीण काळात प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. विविध रंगी विविध ढंगी प्रहसनं सादर करून या कार्यक्रमाने अल्पावधीत अमाप लोकप्रियता मिळवली. येत्या 15 ऑगस्टपासून या कार्यक्रमाचं अजून एक पर्व पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने सामना ऑनलाईनने या कार्यक्रमातील विविध कलाकारांशी संवाद साधला.

कोरोनापूर्वी देखील हा कार्यक्रम सुरू होता. मात्र, कोरोनाच्या दरम्यान सामान्यांमध्ये पसरलेल्या भीतीपासून विरंगुळा मिळवून देणारा कार्यक्रम अशी हास्यजत्राची ओळख बनत गेली. या ओळखीमुळे भाषेचं अंतरही मिटल्याचं मनोगत हास्यजत्रेतील ज्येष्ठ कलाकार प्रभाकर मोरे यांनी सांगितलं. सामना ऑनलाईनशी बोलताना त्यांनी एक किस्साही शेअर केला.

ते म्हणाले की, मी काही कारणास्तव महाबळेश्वर येथे गेलो होतो. तेव्हा तिथे एका हॉलमध्ये लग्नसोहळा सुरू होता. तिथे गुजराती समुदायाचं लग्न होत होतं. त्या लग्नाला उपस्थित असलेल्या काही वऱ्हाडींनी मला ओळखलं. ते माझ्याकडे आले आणि एकमेकांना गुजरातीत सांगू लागले. त्यांच्या बोलण्यात मी हास्यजत्रेतील स्कीटमध्ये उच्चारत असलेले काही ठेवणीतले शब्द होते. उदा. शालू, वळीखलंव काय? वगैरे. ते पाहून गंमत वाटली. त्यांनाही मराठी भाषेच्या बाणकोटी बोलीचा गोडवा कळत होता. हे कलाकार म्हणून मला फार समाधान देणारं होतं, असं मनोगत प्रभाकर मोरे यांनी व्यक्त केलं.