वैजनाथाच्या पालखीने सोहळ्याने महाशिवरात्र उत्सवाची सांगता

475

महाशिवरात्रीनंतर निघणाऱ्या प्रभू वैजनाथाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने झाला. चांदीने मढवलेल्या पालखीत श्री प्रभु वैजनाथांची मुर्ती ठेवण्यात आली होती. वैजनाथ मंदिरातून पालखी सोहळ्याचे सायंकाळी 6 वाजता प्रस्थान झाले. प्रभू वैजनाथाची पालखी देशमुख पार, अंबेवेस, बांगर गल्ली, गणेशपार, नांदूरवेस, गोपनपाळे गल्ली या भागात गेली. तेथे भाविकांनी प्रभू वैजनाथाच्या पालखीचे स्वागत केले. पालखीच्या स्वागतासाठी भक्तांनी पालखी मार्ग रांगोळयाची आरास काढून रोशनाईने सजवला होता.

महाशिवरात्रीनिमित्त देशमुख पारावर वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने रविवारी सायंकाळी प्रसिद्ध गायक पंडित धनंजय म्हसकर व प्राजक्ता काकतकर यांची संगीत संध्या आयोजित केली होती. ती उत्साहात पार पडली. यावेळी वैजनाथ देवल कमिटीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. भक्तीगीत गायन व विविध भक्तिगीते, भावगीते सादर करून शास्त्रीय गायकीची मेजवानीच रसिकांना मिळाली. प्रभु वैजनाथाची पालखी मंदिरातून सवाद्य मिरवणुकीने निघुन देशमुख पार येथे विसावली. या ठिकाणी भक्तीगीत व अभंगवाणी कार्यक्रम झाला. तसेच अंबेवेस येथे शोभेचे फटाके उडविण्यात आले. त्यानंतर गणेशपार, नांदूरवेस व गोपनपाळे गल्ली येथे कलावंतांची हजेरीचा पारंपरिक कार्यक्रम व अंबेवेस मार्गे नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाली. या मिरवणूकीत श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी राजेश देशमुख यांच्यासह विश्वस्त प्रा. प्रदिप देशमुख, पुजारी मानकरी, ब्रह्मवृंद, सांगीतिक सेवा देणारे कलाकार, भोई बांधव, भालदार, चोपदार , मशालधारी देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी, वासुदेव यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या