वैजनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; “वैजनाथ भगवान की जय” च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

648

महाशिवरात्रीच्या पर्वावर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांची गर्दी उसळली होती. यावेळी लाखो भाविकांनी वैजनाथांचे दर्शन घेतले. महाशिवरात्रीनिमित्त वैजनाथ देवस्थान ट्रस्ट व पोलीस प्रशासनाने अत्यंत चांगल्या दर्शन सुविधा देण्यासोबतच कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. वैजनाथाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशमधील भाविकही मोठ्या प्रमाणात आले होते. गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

दर्शनार्थींच्या स्त्री-पुरूष व पासधारक अशा तीन स्वतंत्र रांगा करण्यात आल्या होत्या. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनानेसुद्धा अतिशय चांगले काम केले. पावर हाऊस व आर्य वैश्य मंगल कार्यालयाजवळ दुचाकी व चारचाकी असे सर्व वाहने अडवण्यात आले होते. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन दक्ष होते. वैजनाथ भगवान की जय, हर हर महादेव शंकर भगवान की जय च्या जयघोषात मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. सायंकाळी वैजनाथ देवस्थान कमिटीतर्फे बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रभू वैजनाथास रूद्राभिषेक करून शासकीय पूजा करणार आहेत.

दुपारी 3 च्या सुमारास सोमेश्वर,जगमित्र येथील पालखी वैजनाथ मंदिरात आली होती. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शहरातील विविध सेवाभावी संस्था,राजकीय पक्ष ,संघटना यांकडून उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. यामध्ये साबुदाना खिचडी, विविध फळांचे वाटप करण्यात आले. यासाठी स्वयंसेवक उस्फूर्ततेने सहभागी झाले होते. दिव्य ज्योती जागृती संस्थान व श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने बाहेर गावावरून येणाऱ्या भाविकांसाठी पोलीस ठाण्यासमोरील पटांगणात लगेज स्टॉलची व्यवस्था करण्यात आली होती. वैजनाथ देवस्थान ट्रस्टमार्फत शनिवारी परिसरातील सर्व शिव भक्तांना दर्शन मंडप येथे महाप्रसाद वाटपाचे आयोजन केले आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या