महात्मा गांधी यांचे पणतू सतीश धुपेलिया यांचे कोरोनाने निधन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू सतीश धुपेलिया यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते. न्यूमोनियाने ग्रस्त झालेल्या धुपेलिया यांच्यावर गेला महिनाभर इलाज सुरू होता. रुग्णालयातच त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

धुपेलिया हे मूळचे दक्षिण आफ्रिकेचे रहिवासी होते. तीनच दिवसांपूर्वी त्यांचा वाढदिवस होता. त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांची बहीण उमा धुपेलिया मेस्थरी यांनी दिली आहे. धुपेलिया यांच्या पश्चात दोन बहिणी आहेत. त्यातील एका बहिणीचं नाव कीर्ती मेनन असं आहे. ती सध्या जोहान्सबर्ग येथे राहते आणि गांधी विचारधारेचा प्रसार करते.

धुपेलिया भाऊ-बहीण मणिलाल गांधी यांचे वंशज आहेत. मणिलाल यांनी दक्षिण आफ्रिकेत राहून गांधीवादाचा प्रचार केला होता. सतीश धुपेलिया हे माध्यमकर्मी म्हणून कार्यरत होते. व्हिडीओग्राफर आणि फोटोग्राफर म्हणून काम करताना त्यांनी गांधीवादाचा प्रसार केला. गांधी विकास ट्रस्टच्या माध्यमातून ते काम करत होते.

आपली प्रतिक्रिया द्या