अभिनव ग्रंथप्रदर्शन ! ग्रंथनगरीत पुस्तकांचे 290 स्टॉल

वर्धा संमेलनात मोठय़ा प्रमाणात प्रकाशन संस्थांचे स्टॉल आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथनगरी असे ग्रंथ दालनाचे नाव आहे. यामध्ये   पुस्तकांचे तब्बल 290 स्टॉल आहेत.

ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मावळते संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते झाले. यावेळी गिरीश गांधी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे आदी उपस्थित होते. प्रदर्शनात  महाराष्ट्र तसेच हैदराबाद, दिल्ली, गोवा येथील प्रकाशकांचे स्टॉल आहेत. त्यापैकी काही प्रकाशकांनी पुस्तकांवर 50 टक्के सवलत जाहीर केली आहे.

ग्रंथप्रदर्शन समन्वयक नरेश सबजीवाले यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाचे ग्रंथ प्रदर्शन अभिनव आहे. भव्य प्रशस्त स्टॉल आणि प्रत्येक स्टॉलवर साहित्य संमेलनाचा लोगो लावण्यात आला आहे.  संमेलन कालावधीत 75 हजार ते लाखभर पुस्तकप्रेमी ग्रंथ दालनाला भेट देतील, असा अंदाज आहे.

प्रकाशकांची नाराजी

संमेलनात स्टॉल उभारण्यासाठी प्रकाशन संस्थांकडून सात हजार रुपये भाडे घेण्यात आले आहे. मात्र त्या तुलनेत सुविधा नसल्याची नाराजी काही प्रकाशकांनी व्यक्त केली. स्टॉल उभारण्यासाठी ‘अक्रॅलिक शिट’ ऐवजी कापडाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पुस्तके खराब होण्याची शक्यता आहे. तसेच स्टॉलचा आकार लहान आहे, अशा तक्रारी काही प्रकाशकांनी केल्या. तसेच आयोजकांनी प्रकाशन संस्थेच्या केवळ एकाच व्यक्तीची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था  केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.