
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात यात्रा भरणे हे काही नवीन नाही. देवीदेवतांच्या नावाने तर कुठे पिराच्या नावाने यात्रा भरलेली आपण ऐकतो. मात्र लातूर जिल्ह्यात थेट महात्मा गांधींच्या नावाने मागील 71 वर्षापासून अनोखी यात्रा भरवण्यात येते. या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. सदरील यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात्रेत किमान 60 क्विंटल साखरेच्या जिलेबीची विक्री होते. यात्रेला आलेला प्रत्येक जण यात्रेतून जिलेबी घेऊन परत जातो. पंचक्रोशी मध्ये याला जिलेबीची यात्रा असेही म्हटले जाते.
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे उजेड( हिसामाबाद ) या गावांमध्ये सर्वांना सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या नावानेच यात्रा भरवण्यात येते .काहीजण याला गांधीबाबा यात्रा असेही म्हणतात 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या जोखडातून हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले परंतु मराठवाडा हा निजामाच्या अध्यापत्याखाली असल्यामुळे मराठवाड्याला स्वतंत्र होण्यासाठी एक वर्ष अधिक वाट पहावी लागली. स्वातंत्र्यापूर्वी या ठिकाणी यात्रा भरत असे परंतु निजामाच्या काळात ही यात्रा बंद करण्यात आली. धार्मिक तेढ यात्रेच्या माध्यमातून निर्माण होते असे कारण देण्यात आलेले होते. निजामाच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर मराठवाडा महाराष्ट्र मध्ये सामील झाला. 26 जानेवारी 1950 मध्ये संविधान लागू झाले आणि पुढच्या वर्षापासून सर्वांना समतेचा संदेश देण्यासाठी म्हणून उजेड येथे थेट महात्मा गांधींच्या नावाने यात्रा सुरू करण्यात आली.
या यात्रेच्या माध्यमातून ग्रामसफाई, आरोग्य तपासणी, जनावरांची तपासणी, प्रदर्शन, जंगी कुस्ती, असे उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली. कोरोनाच्या कालखंडामध्ये यात्रा रद्द करण्यात आलेली होती मात्र आता पुन्हा ही यात्रा यावर्षी सुरू करण्यात आली आहे. निमित्ताने उजेड गावातील शाळेमधील विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांन पारितोषकांचे वितरणही करण्यात येते.
यावर्षी या यात्रेचे 71 वे वर्षे आहे. परंतु शासकीय आणि शासन स्तरावर या यात्रेकडे गांभीर्याने कोणी पाहत नाही. त्यामुळे या यात्रेसाठी कसल्याही प्रकारचा शासकीय निधी मिळत नाही. ग्रामस्थ समिती तयार करून निधी संकलन करतात आणि त्यातून ही यात्रा भरवण्यात येते. सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारी ही यात्रा खरे तर प्रशासन, लोकप्रतिनिधी, आणि शासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे व याला शासकीय निधी उपलब्ध करून देणे गरजेचे असतानाही त्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिलेली नाही अशी खंत ग्रामस्थांची आहे.
यात्रा म्हटले की बाजार आलाच. ग्रामीण भागातील आवश्यक असणाऱ्या अनेक वस्तू या यात्रेच्या माध्यमातून लोकांना खरेदी करता येतात. लहान मुलांसाठी यात्रेत वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आलेले असतात. नाश्त्याचे हॉटेल्स, विविध दुकाने यांनी उजेड गावातील रस्ते भरून गेलेले असतात.
उजेडच्या यात्रेतील जिलेबी हे खास आकर्षण
उजेड येथे भरणाऱ्या या यात्रेतील एक खास आकर्षण आहे ते म्हणजे या यात्रेत विकली जाणारी जिलेबी. जिलेबी विक्रीचे मोठ्या प्रमाणात स्टॉल या ठिकाणी लागलेले असतात. पंचक्रोशीतून या यात्रेसाठी येणारे नागरिक येथील जिलेबी हमखास घरी घेऊन जातात. यात्रेमध्ये किमान 60 क्विंटल ची जिलेबी विकली जाते असे ग्रामस्थांनी सांगितले. उजेडच्या यात्रेमध्ये आला आणि जिलेबी न खाता गेला असे कधी होणार नाही असेही अभिमानाने लोक सांगतात. एक प्रकारे जिलेबीची यात्रा असे संबोधले जाते.