शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांची निवड पूर्ण, 21 फेब्रुवारीपासून नावे होणार जाहीर

2335

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांची निवड पूर्ण झाली आहे. येत्या 21 फेब्रुवारीपासून त्यांची नावे सरकारी पोर्टलवर प्रकाशित केली जाणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात 58 हजार 505 शेतकरी यासाठी पात्र ठरले आहेत.

राज्य सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतच कर्ज माफ करण्याची योजना जाहीर केल्यानंतर त्याचा लाभ केव्हा मिळेल, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. ही मदत मार्च महिन्यापासून मिळणार, असे सरकारने जाहीर केल्यामुळे प्रशासन कामाला लागले असून याची तयारी पूर्ण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 58 हजार 505 शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले असून, त्यासाठी 600 कोटींवर रक्कमही मंजूर झाली आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार असून, ती शासकीय पोर्टलवर 21 फेब्रुवारी रोजी प्रकाशित केली जाणार आहे. याशिवाय ग्रामपंचायत, राष्ट्रीय आणि जिल्हा बँकांच्या प्रत्येक शाखेत प्रसिद्ध केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपले नाव तपासून आपले सरकार सेवा केंद्रात जायचे आणि बायोमेट्रिक पध्दतीनं आधार लिंक करायचं आहे. त्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊन सातबारावर ती चढवली जाणार आहे, अशी माहिती चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिली.

दरम्यान, या लाभार्थ्यांमध्ये 37 हजार शेतकरी जिल्हा सहकारी बँकेचे, तर उर्वरित सुमारे 21 हजार शेतकरी राष्ट्रीय बँकांचे सभासद आहेत. प्रकाशित यादीत काही चुका असल्यास ऑनलाईन ती दुरुस्त करण्याची व्यवस्थाही आपले सरकार सेवा केंद्रात करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या