महाविकास आघाडीची वज्रमूठ, संभाजीनगरात आज दणदणीत आणि खणखणीत सभा

स्थळ – मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, संभाजीनगर
वेळ – सायंकाळी 5 वा.

भाजपच्या हुकूमशाहीविरोधात एकीची वज्रमूठ आवळण्यासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या विशाल मैदानावर रविवार, 2 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची महागर्जना घुमणार आहे. भाजप-मिंध्यांनी सभेला अपशकुन करण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व अडथळे दूर करून होणाऱया या सभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सगळीकडे चर्चा फक्त सभेचीच असून ‘चलो मराठवाडा सांस्कृतिक मंडळ’ असे फलक जागोजागी लागले आहेत. या सभेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते-विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मार्गदर्शन करणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे रविवार, 2 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची भव्य जाहीर सभा होणार आहे. सभेला दोन दिवस उरले असतानाच भाजप-मिंधेंनी त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. किराडपुऱयात दंगल घडवून वातावरण कलुषित करण्याचा कुटील डाव खेळण्यात आला, परंतु सभा होणारच असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठणकावून सांगितले. पोलीस प्रशासनाने अटीशर्ती लादून महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी दिली. गर्दीचे अनेक विक्रम मोडीत काढणाऱया या सभेची तयारी पूर्ण झाली आहे.