महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीमुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा

684
प्रातिनिधिक फोटो

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेत पंढरपूर तालुक्यातील 13 हजार 436 शेतकऱ्यांचे 140 कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कर्ज माफी योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार, दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येत आहेत. पंढरपूर तालुक्यातील सुमारे 15 हजार 287 शेतकर्यांनी या कर्ज माफीसाठी शासनाला माहिती दिली होती. त्यापैकी 13 हजार 436 शेतकरी कर्ज माफीसाठी पात्र ठरले आहेत.

राज्य शासनाने राज्यस्तरावरील कर्जमाफीची दुसरी यादी शनिवारी जाहीर केली. त्यानुसार रविवारी प्रत्येक ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. कर्ज माफीच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर याद्या पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्रावर गर्दी केली. याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रांताधिकारी सचिन ढोले, सहाय्यक निबंधक एस.एम तांदळे यांनी वाखरी, सोनके आदी ठिकाणी भेटी देऊन कर्जमाफी याद्याची पहाणी केली. यावेळी त्यांनी ग्रामसेवक, सोसायटयांचे सचिव आणि कृषी सहाय्याकांना सूचना दिल्या. जिल्ह्यात सर्वाधिक कर्जमाफीचा लाभ पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना झाला आहे.

पंढरपूर तालुक्यातील 13 हजार 436 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना एकूण सुमारे 140 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी यादीतील क्रमांक, बॅंक पासबुक आणि आधार कार्ड घेऊन आपले सरकार किंवा ई सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करावे. हे प्रमाणिकरण विनाशुल्क आहे.
– सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर

आपली प्रतिक्रिया द्या