राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून महाविकास आघाडीच्या आमदारांनी केला निषेध

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. हा प्रकार म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे म्हणत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. मविआचे आमदार तोंडाला काळी पट्टी बांधून पायऱ्यांवर बसले होते. यावेळी यातील काही आमदारांनी हातामध्ये लोकशाहीची हत्या असे फलकही धरले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)


लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर खासदार वा आमदाराला दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा झाली, तर सदस्यत्व रद्द केले जाते. मात्र सुरत सत्र न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि अवघ्या 24 तासांच्या आतच लोकसभा सचिवालयाने खासदारकी रद्द केली. धक्कादायक म्हणजे न्यायालयाने राहुल गांधींना तत्काळ जामीन मंजूर करताना शिक्षेला 30 दिवसांची स्थगिती दिली असतानाही तत्परतेने ही कारवाई झाली. यामुळे देशभरात तीक्र संताप व्यक्त होत असून ठिकठिकाणी उग्र निदर्शने सुरू आहेत. सर्वच विरोधी पक्षांनी मोदी सरकारच्या या राजकीय सूडनाटय़ाचा तीव्र निषेध केला आहे.

राहुल गांधी यांनी 2019मध्ये कर्नाटकात बोलताना ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का?’ असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याविरोधात गुजरातमधील भाजपचे आमदार पुर्णिश मोदी यांनी सुरत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. गुरुवारी न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवताना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि 30 दिवसांचा जामीनही दिला.