सिंधुदुर्ग जिह्यातील राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. मालवणमध्ये महाविकास आघाडीने आज जनसंताप मोर्चा काढून या दुर्दैवी घटनेचा आणि त्यास जबाबदार असणाऱ्या मिंधे सरकारचा तीव्र निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, या मिंधे सरकारचा करायच काय… खाली डोपं वर पाय अशी तुफान घोषणाबाजी करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मालवण शहर परिसर दणाणून सोडला. या मोर्चादरम्यान मालवण बाजारपेठेतील दुकानदारांनीही दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.
मालवण राजकोटवरील पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ शिवसेना नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात जनसंताप मोर्चा काढण्यात आला. मालवण भरड नाका ते फोवकांडा पिंपळपर्यंत भरपावसात काढण्यात आलेल्या या मोर्चात शिवप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. राजकोटवरील घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते गेले असताना भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती मिळताच मोर्चातील कार्यकर्त्यांनी राजकोटच्या दिशेने धाव घेतली. राजकोट येथे दोन्ही बाजूच्या गर्दी केल्यामुळे त्या ठिकाणी वातावरण काहीसे तंग झाले होते. मोर्चातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते राजकोट येथे दाखल झाल्यामुळे जवळपास एक तास मोर्चात खंड पडला. त्यानंतर तासाभराने राजकोट येथून पुन्हा मोर्चा सुरू झाला.
शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, शिवसेना सहसंपर्कप्रमुख संजय पडते, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, संपर्कप्रमुख अतुल रावराणे, शिवसेना उपनेत्या जान्हवी सावंत, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सावंतवाडी शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मंदार शिरसाट, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, नंदूशेठ घाटे, माजी नगराध्यक्षा महेश जावकर, विश्वास साठे, काँग्रेस देवगड तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
महिलांची उपस्थिती लक्षणीय
मालवण भरड नाका येथून मोर्चाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे हातात भगवा झेंडा, गळय़ात भगवी शाल परिधान केलेल्या महिलांची उपस्थिती अधिक होती. मोर्चातील असंख्य कार्यकर्त्यांच्या हातात शिवरायांची प्रतिमा असलेले बॅनर झळकत होते.
मोर्चासाठी शिवसेना शाखेबाहेर गर्दी
या मोर्चात सहभागी होण्यासाठी शिवसेना शाखा तसेच भरड नाका परिसरात शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि शिवप्रेमींनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती.
मनोज जरांगे 1 सप्टेंबरला मालवणात जाणार
छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. आमच्या दैवताचा अपमान कदापि सहन करणार नाही, असा खणखणीत इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी मिंधे सरकारला दिला. 1 सप्टेंबर रोजी आपण सिंधुदुर्ग राजकोटावर जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जे औरंगजेबालाही करता आले नाही ते महायुतीच्या भ्रष्ट सरकारने केले -जयंत पाटील
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोटवरील पुतळा कोसळय़ाने शरमेने सर्वांच्या माना खाली गेल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या विरोधात अनेकांनी लढाया लढल्या, पण ते कधी कुणाला नमले नाहीत. पण, आज दुर्दैवाने त्याच महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारी लोकांनी उभारला आणि तो पडला. जे औरंगजेबालाही करता आले नाही ते काम राज्यातील महायुतीच्या भ्रष्ट सरकारने केले, असा घणाघात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. भ्रष्टाचाराचा कळस राज्यातील या सरकारने गाठला आहे. या सरकारची एवढी मजल गेली की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतानादेखील त्यात भ्रष्टाचार केला म्हणून राजकोट किल्ल्यावर जी घटना घडली आहे त्याची निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करून या घटनेची चौकशी करावी. दोन्ही विरोधी पक्षनेत्यांच्या संमतीने निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करावी. नौदलाला यामध्ये दूषण देऊन बदनाम करू नका. या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची होती. बांधकाम विभागाचा भ्रष्टाचार उघड झाला पाहिजे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
पुतळा दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी समिती
राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. शिवरायांचा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
केसरकर पत्रकारांवर भडकले
कदाचित वाईटातून उद्या काही चांगले घडेल हे वक्तव्य शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना भारी पडले आहे. त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी आज त्यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली होती. पण तिथेही तोफगोळे पडावेत असा केसरकर यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला. त्यामुळे केसरकर संतापले व त्यांनी माध्यमांचे कॅमेरे हटवायला लावले.
लोकहो, चूक झाली… हात जोडून माफी मागतो! – अजित पवार
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दुर्दैवी घटना आहे. लोकहो, उपमुख्यमंत्री म्हणून या घटनेबद्दल मी हात जोडून जाहीर माफी मागतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले.
मालवणात कडकडीत बंद
राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि शिवप्रेमींच्या वतीने मालवण बंदची हाक देण्यात आली. या हाकेला मालवणवासीय तसेच व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्तपणे दुकाने तसेच आपापले व्यवसाय बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता.
सरकारच्या पुतळय़ाचा सिंहगडावरून कडेलोट
शिवसेना खडकवासला विधानसभा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्यावतीने सिंहगड किल्ल्यावरुन राज्य शासन आणि संबंधित ठेकेदार यांच्यविरोधात निषेधात आंदोलन करण्यात आले. इतकी मोठी वाईट घटना होऊन देखील त्यांच्यावरती अतिशय बालिश पद्धतीने स्टेटमेंट देणाऱ्या राज्य शासनातील जबाबदार मंत्री यांचा निषेध करत महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचा अपमान झाल्याप्रकरणी, त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांचा अवमान झाल्याप्रकरणी किमान पक्षी माफी ही मागण्याची दानत दाखवावी, असे मत युवासेना जिल्हाअधिकारी व निवडणूक समन्वयक सचिन पासलकर यांनी व्यक्त केले.
भ्रष्टाचारी सरकारचा जनताच कडेलोट करेल, असा विश्वास जिल्हा संघटक बुवा खाटपे, उपजिल्हाप्रमुख रविंद्र मुजुमले व संदीप मते यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शहरसंघटक संतोष गोपाळ, पोपट चोरगे, नाना मरगळे, दीपक खिरीड, विनायक अप्पा नलावडे, निवृत्ती वाव्हळ, प्रदीप दोडके, आकाश यादव, सागर जावळकर, अरुण घोगरे उपस्थित होते.