महाविकास आघाडीची उद्या नागपुरात वज्रमूठ सभा!

भाजपच्या दडपशाहीला आव्हान देत लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीने वज्रमूठ आवळली असून छत्रपती संभाजीनगरात पहिली विराट वज्रमूठ सभा झाल्यानंतर रविवारी नागपुरात महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा होत आहे. या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून महाविकास आघाडीचे अन्य प्रमुख नेतेही मार्गदर्शन करणार आहेत. भाजपला बालेकिल्ल्यातच पह्डून काढणारी ही सभा ठरणार आहे.

नागपूरमधील नंदनवन, केडीके कॉलेजसमोरील दर्शन कॉलनी मैदान येथे रविवारी सायंकाळी 5 वाजता ही सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. माजी मंत्री सुनील केदार या सभेचे समन्वयक आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून या सभेचे नियोजन करण्यात आले आहे. आज शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सभास्थळी जाऊन तयारीचा आढावा घेतला. या सभेला उद्धव ठाकरे यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेतील काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत.

नाना पटोले छत्रपती संभाजीनगरनंतर आता नागपूरच्या वज्रमूठ सभेलाही उपस्थित राहणार नाहीत, अशा चर्चा रंगवल्या जात होत्या. त्याला नाना पटोले यांनी आज पूर्णविराम दिला. या सभेबाबत पटोले यांना विचारले असता, कोण म्हणतो मी सभेला येणार नाही. मी या सभेला निश्चितपणे उपस्थित राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या सभेला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहतील. ही सभा होऊ नये यासाठी भाजपने प्रयत्न केले. हा विषय कोर्टातही नेला गेला. मात्र त्यांचे प्रयत्न फसले आहेत, असे पटोले म्हणाले.

 संजय राऊत यांनी सभास्थळाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. गड वगैरे काही नसतात. असे अनेक गड तुटून पडले आहेत. त्याचा प्रत्यय तुम्हाला रविवारी येईल, असे राऊत म्हणाले. या सभेला अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला. कायदेशीर बाबी पूर्ण करूनही त्रास दिला जात असेल तर ज्याला ते आपला गड म्हणताहेत त्या गडातच त्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे हे स्पष्ट होते, अशी तोफ राऊत यांनी डागली. लोकांनीच तुम्हाला धक्का द्यायचे ठरवले असेल तर गड कसा सांभाळणार, असा सवाल त्यांनी केला.

 सभा रोखण्याचा प्रयत्न फसला

महाविकास आघाडीच्या सभेला भाजपकडून आडकाठी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजप आमदार कृष्णा खोपडे या सभेला सातत्याने विरोध करत आहेत. मैदान बचाव समितीच्या माध्यमातूनही विरोधाचा सूर आळवण्यात आला. या सभेला लाखोंची गर्दी होऊन स्थानिकांना त्रास होईल, असा दावा करत धीरज शर्मा यांनी हायकोर्टात धाव घेतली, मात्र या सभेला कोर्टाने परवानगी दिली असून पोलिसांनी सभेसाठी काही अटी-शर्ती घातल्या आहेत.

स्थळ

दर्शन कॉलनी मैदान, नंदनवन, नागपूर

वेळ

सायंकाळी 5 वाजता