महाविकास आघाडीची एकजूट, नाशिकमध्ये शिवसेनेचा अपक्ष शुभांगी पाटील यांना पाठिंबा

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र अखेर सोमवारी स्पष्ट झाले. नाशिक पदवीधर मतदारसंघातून कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यात आला. तर नागपूर शिक्षक मतदारसंघातून गंगाधर नाकाडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत शिवसेनेने कॉँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर करत महाविकास आघाडीची एकजूट दाखवून दिली.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रपणे लढविण्याचा निर्णय शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसने घेतला होता. त्यानुसार नागपूर शिक्षक शिवसेना, संभाजीनगर शिक्षक राष्ट्रवादी, कोकण शिक्षकमधून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱया शेकाप आणि नाशिक व अमरावती पदवीधर या दोन जागा काँग्रेसने निवडणूक लढायचे असे ठरविण्यात आले होते. त्यानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्जही दाखल केले. मात्र, नाशिकमध्ये सुधीर तांबे यांनी अर्ज न भरल्यामुळे गोंधळ उडाला. त्यानंतर महाविकास आघाडीने जागांची अदलाबदल करून त्यावर मार्ग काढला.

सत्यजित तांबे यांना निलंबित करण्याच्या सूचना
सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबित करण्याच्या सूचना कॉँग्रेसच्या पेंद्रीय शिस्तपालन समितीने प्रदेश कॉँग्रेसला दिल्या आहेत. सत्यजित हे आमदार-खासदार नसल्याने त्यांच्याविरुद्धची कारवाई केंद्रीय समितीकडून नव्हे, तर प्रदेश स्तरावरच होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय समितीचे सदस्य विनायक देशमुख यांनी दिली. डॉ. सुधीर तांबे यांच्याप्रमाणेच सत्यजित यांच्याविरुद्धही निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.

राष्ट्रवादीतून प्रदीप सोळुंके यांची हकालपट्टी
राष्ट्रवादी कॉँग्रेसने संभाजीनगर शिक्षक मतदारसंघातून विक्रम काळे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे प्रदीप सोळुंके यांनी अर्ज दाखल केल्याने पेच निर्माण झाला होता. अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्यावरही त्यांनी तो मागे न घेतल्यामुळे पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी प्रदीप सोळुंके याची पक्षातून हकलापट्टी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.

नाशिकमधून उमेदवारी जाहीर झालेले कॉँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेत मुलगा सत्यजित तांबे याचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने गोंधळ निर्माण झाला. यानंतर शिवसेनेने यामध्ये पुढाकार घेत नाशिकमधील शिवसेना पदाधिकाऱयांशी चर्चा करून अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच नागपूर शिक्षक मतदारसंघातील शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मागे घेत कॉँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन देत नाशिकच्या बदल्यात ही जागा कॉँग्रेससाठी सोडली.

अशी होणार प्रमुख लढत

नाशिक पदवीधर
अपक्ष शुभांगी पाटील (शिवसेना) विरुद्ध सत्यजित तांबे

अमरावती पदवीधर
धीरज लिंगाडे (कॉँग्रेस) विरुद्ध डॉ. रणजित पाटील (भाजप)

कोकण शिक्षक
बाळाराम पाटील (शेकाप) विरुद्ध ज्ञानेश्वर म्हात्रे (भाजप)

संभाजीनगर शिक्षक
विक्रम काळे (राष्ट्रवादी) विरुद्ध किरण पाटील (भाजप)

नागपूर शिक्षक
सुधाकर अडबाले (कॉँग्रेस पुरस्कृत) विरुद्ध नागोराव गाणार (भाजप पुरस्कृत)