‘महावितरण’मध्ये 30 हजार कोटींचा घोटाळा

1033

महावितरणने वीज वापराच्या आकडय़ांमध्ये गोलमाल करत गेल्या पाच वर्षांत तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. शेतकऱयांना वर्षाला तब्बल 33 हजार 856 दशलक्ष युनिट वीज पुरवल्याचे महावितरण सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र 22 हजार 856 दशलक्ष युनिट एवढा शेतकऱयांचा वीज वापर असल्याचे वीज नियामक आयोगाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वाढीव वीज वापर दाखवून महावितरणने शेतकऱयांकडून 22 हजार कोटी रुपये तर सरकारकडून सवलतीच्या माध्यमातून 8 हजार 225 कोटी रुपये लाटल्याचे निश्चित झाले आहे.

महावितरणकडून सुमारे चार रुपये प्रति युनिट दराने वीज खरेदी केली जाते. तर ग्राहकांना प्रति युनिट सहा रुपये विक्री दर आहे. मात्र औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना सुमारे तीन रुपये जादा दराने वीज पुरवली जाते. तर शेतकऱयांना मूळ विक्री दरापेक्षा कमी दराने वीज पुरवली जाते. त्यापैकी शेतकऱयांना दीड रुपया मोजावा लागतो, तर उर्वरित रक्कम सरकार महावितरणला देते. मात्र महावितरण शेतकऱयांच्या प्रत्यक्ष वीज वापरापेक्षा जादा वीज वापर असल्याचे दाखवून शेतकऱयांची आणि सरकारची लूट करत आहे. वर्षाला सुमारे अकरा हजार दशलक्ष युनिट विजेचा जादा वापर दाखवला आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षांचा विचार करता सरकार आणि शेतकऱयांवर 30 हजार कोटी रुपये अतिरिक्त लादले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वीज चोरी लपवण्यासाठी शेतकऱयांचा जादा वीज वापर दाखवला

वीज आयोगाने केलेल्या चौकशीतून शेतकऱयांचा वर्षाला सुमारे 22 हजार 856 दशलक्ष युनिट एवढा वीज वापर असल्याचे समोर आले आहे. मात्र महावितरणने आपली वीजचोरी लपवण्यासाठीच शेतकऱयांचा वीज वापर 33 हजार दशलक्ष युनिटपेक्षा जादा असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे शेतकरी आणि सरकारवर अतिरिक्त भार पडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या