शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील आणि शिवसेनेच्या सत्ताकाळात पूर्णत्वाकडे गेलेल्या कोस्टल रोडचे श्रेय लाटण्यासाठी मिंधे-भाजपकडून मुंबईभरात जोरदार पोस्टरबाजी सुरू आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मिंधे-भाजपकडून ठिकठिकाणी पोस्टरबाजी करून ‘हे काम आपणच केल्याचे’ होर्डिंग लावून मुंबईकरांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे मिंधे-भाजपच्या कारस्थानाविरोधात मुंबईकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
‘सुखाचा प्रवास, मोकळा श्वास’ अशा संकल्पनेतून कोस्टल रोडमध्ये प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी-लिंकपर्यंतच्या 10.58 किमीचा मार्ग बांधण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे 70 टक्के वेळ तर 34 टक्के इंधनाची बचत होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोडची संकल्पना मांडल्यानंतर सल्लागार नेमण्यापासून कामाचे भूमिपूजन आणि बहुतांशी कामच शिवसेनेच्या सत्ताकाळात पूर्ण झाले. पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या या कोस्टल रोडसाठी शिवसेना सत्तेत असताना पालिका सभागृहासह स्थायी आणि सर्वच वैधानिक समित्यांकडून 14 हजार कोटींच्या कोस्टल रोडला मंजुरी देण्यात आली.
शिवसेनेने असे केले ‘स्पीडब्रेकर’ पार
कोस्टल रोडचे काम 13 ऑक्टोबर 2018 मध्ये सुरू करण्यात आले. मात्र मुंबई उच्च न्यायालयात पर्यावरणाचे कारण देत ‘कोस्टलविरोधात’ याचिका दाखल करण्यात आल्यामुळे न्यायालयाकडून 16 जुलै 2019 ला कामाला स्थगिती देण्यात आली. मात्र सर्वेच्च न्यायालयाने ‘मुंबईत वाढलेली वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड आवश्यक असल्याचे सांगत 17 डिसेंबर 2019 रोजी स्थगिती उठवल्याने 18 डिसेंबर 2019 पासून पुन्हा काम वेगाने सुरू करण्यात आले. कोरोनामुळे कोस्टल रोडच्या कामावर काही मर्यादा आल्या. तरीदेखील शिवसेनेच्या सत्ताकाळात कोविड खबरदारी घेऊन काम सुरू ठेवण्यात आले होते.
लोकसभा निवडणुकीआधीपासून कारस्थान
z शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केलेल्या कोस्टल रोडच्या कामाचे श्रेय लाटण्याचा डाव काम अपूर्ण असतानाच मिंधे-भाजपने साधला. या मार्गाची एक लेन 11 मार्च रोजी घाईघाईत फक्त दिवसभरासाठी सुरू करण्यात आली. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर दुसरी लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली.
एक वर्षाने डेडलाइन वाढली
z कोस्टल रोडचे काम 13 ऑक्टोबर 2018 मध्ये सुरू करण्यात आले. हे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होऊन 100 टक्के वाहतूक सुरू होणे निश्चित होते. शिवसेनेच्या सत्ताकाळात कामाची प्रगतीही योग्य होती. यामध्ये 60 टक्क्यांवर काम पूर्ण झाले होते. मात्र मिंधे-भाजप सरकारच्या काळात काम रेंगाळल्याने तब्बल एक वर्षाने कामाचा कालावधी वाढला.
z अडीच वर्षांत कोस्टल रोडचे एकूण काम फक्त 93 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. वांद्रे-वरळी सी-लिंकला जोडण्याचे काम डिसेंबर 2024 मध्ये पूर्ण होणार असून प्रत्यक्षात संपूर्ण रोड जानेवारी ते फेब्रुवारी 2025 मध्येच सुरू होईल अशी आशा आहे.