स्वानुभवांची सिद्धहस्त लेखणी

अनुराधा राजाध्यक्ष,anuradharajadhyakshya@gmail.com

ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे… अत्यंत सुरक्षित जगात राहूनही डोळ्यांनी आणि आत्म्याने जे अनुभवलं.. ते त्यांच्या लेखणीत उतरलं…

माझं लेखन थोडं उशिरा सुरु झालं. पण आमचं घर पुस्तकांचं होतं. वडिलांचं आणि आत्याचं इंग्लिश वाचन आणि आईचं मराठी वाचन. वर्तमानपत्र, मासिकं,पुस्तकं, घरात विकत घेऊन वाचली जायची. माझी आजी ओव्या रचायची. आता वाटतं, त्या लिहून ठेवायला हव्या होत्या. कदाचित छान पुस्तक झालं असतं त्याचं. वडिलांच्या सारख्या बदल्या व्हायच्या, म्हणून शिक्षणासाठी चौथीत होते तेव्हा, सुरतला तारा आत्याकडे राहिले मी… तिथे गुजराती वस्ती आजूबाजूला. त्यामुळे गुजराती शिकले… आजोळ इंदोरचं, म्हणून हिंदीचा वापर असायचा घरात.. अशा तऱहेनं, मराठी, हिंदी इंग्रजी, गुजराती, अशा चारही भाषेतली पुस्तकं वाचायचा नाद जडला होता मला.

वाचन संस्कारातूनच आपल्या अनुभवातलं नाटय आणि संघर्ष लेखणीतून साकार करण्याचं सामर्थ्य माधवी ताईंकडे आलं. हे त्यांच्या बरोबरच्या संवादातून, सतत जाणवत गेलं. त्यांचं लिखाण अनुभवसिद्ध आहे. सत्य घटनांचा आधार घेत ते बहरलं आहे. त्या चौथीत असताना, आत्याच्या घराशेजारी पटेल कुटुंबात, मुलगी जन्माला आल्या आल्या दुधात बुडवून तिला मृत्युच्या दारात ढकलून दिलं जायचं. कारण मुलगी लग्न होऊन सासरी गेली की तिच्या नवऱयालाही आयुष्यभर पोसायची जबाबदारी मुलीच्या आई-वडिलांवर असायची. आर्थिक दृष्टया दुर्बल असणार्या कुटुंबाला ती परवडण्यासारखी नसायची. या घटनेचा खोलवर परिणाम झाल्यामुळेच माधवीताईंनी ‘मन्नू माय चाईल्ड’ ही दीर्घकथा नन्तर लिहिली.

लेखनाआधी पुस्तकांशी मैत्री होण्याचा सगळा कालखंड, माधवीताई सांगत होत्या.. ‘झालं काय की माझी नोकरी ११ ते ७ असायची. माझे यजमान नेव्हीमध्ये. ते नसायचे इथे. मग घरच्यांना काळजी वाटायची. नवरा असता, तर तो घ्यायला आला असता आणि एकटं येण्याचं भय राहिलं नसतं. पण तो तर नाही इथं. अशी सात वाजेपर्यंतची (म्हणजे खूप उशीर होता बरं का तो तेव्हा), नोकरी कशाला? असं एकंदरीत घरच्यांचं मत पडलं. त्यावेळी करिअर म्हणून बायकांच्या नोकरीकडे बघितलं जायचंच नाही. आर्थिक हातभार लागावा, यासाठी काही बायका तेव्हा नोकरी करायच्या. पण आमची सुस्थिती असल्यानं, तीही गरज नव्हतीच. म्हणून ती नोकरी सोडली मी. पण मला नोकरी करायचीच होती.

बोरिवलीमध्ये, ‘स्वामीजी की पाठशाला’ म्हणून शाळा होती. सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी उमेशचन्द्र चौधरी यांनी स्थापन केली होती ती. स्वातंत्र्य मिळणार याची निश्चिती झाल्यावर सुभाषचंद्र त्यांना म्हणाले होते, की राष्ट्रभाषेतून शिक्षण घेणारी पिढी तयार व्हायला हवी.. म्हणून हिंदी माध्यमाची शाळा सुरु कर.. ‘दौलतराम मोहनदास,’ म्हणजेच आताची डी एम हायस्कूल. तिथे आजूबाजूच्या झोपडपट्टीतली मुलं यायची शिकायला. तिथे नोकरीला लागले. पगार कधीकधी तीन-चार महिने नाही व्हायचा, पण पैशांपेक्षा झोपडपट्टीतल्या मुलांचे अनुभव मी अनुभवले, हीच माझी श्रीमंती होती.

आमचं घर नारायण निवास तेव्हा दुमजली होतं.. मागेपुढे गोठा, बाग, फुलांचा घमघमाट. खरं तर तेव्हाचं पार्ले हेच एक विस्तारित कुटुंब होतं. सगळे सगळ्यांना ओळखायचे. कुणी चुकलं, तर आपुलकीच्या अधिकारात कान पकडायचे. माझ्या घरात माझं कौतुक व्हायचं असं जेव्हा मी म्हणते, तेव्हा फक्त नारायण निवास पुरतीच माझी ‘घर’ ही संकल्पना मर्यादित नाही. संपूर्ण पार्ले म्हणजे माझं घर होतं. जे माझ्या कौतुकात सामील व्हायचं. त्याच दरम्यान, हे नोकरी सोडायचा निर्णय घेत होते. दोन मुलगे होते मला. आणि त्या दोघांचे हिरो म्हणजे त्यांचे वडील, जे त्यांच्या नेव्हीच्या नोकरीमुळे फारसे भेटतच नव्हते मुलांना. बदलापूरला सिमेंट पाइपची फॅक्टरी सुरू करण्याचा यजमानांनी निर्णय घेतला आणि मी लिहिण्याचा.. फॅक्टरी सुरू केली, त्यामुळे दिवसभर त्यांची वणवण आणि मेहनत असायची. पण रात्री ते घरी यायचे. मग भरपूर गप्पा व्हायच्या. त्या गप्पांमधून त्यांचे दर्यावर्दी आयुष्यातले विलक्षण रोमांचक अनुभव मी ऐकले. त्यातूनच माझ्या पहिल्या कादंबरीचं बीज मनात रुजलं. ‘मी एक खलाशी’ ही ती कादंबरी. एक कोकणातला मुलगा, केबिन बॉयपासून कॅप्टन कसा होतो, हा प्रवास मी त्यात रेखाटला आहे.

मी मघाशी म्हणाले त्याप्रमाणे पूर्ण पार्ले हेच एक विस्तारित कुटुंब असल्यासारखं होतं तेव्हा. त्यामुळे मुलं खेळत असायची गल्लीत, भूक लागली की कुणाच्याही घरात त्यांना जेवण मिळालेलं असायचं. आमच्या घरीही कुणीही कधीही यावं, जेवावं असाच आपलेपणा होता तेव्हा सगळ्यांमध्ये. आणि अशा वातावरणात मला लिखाणासाठी पूर्ण मोकळीक आणि स्वातंत्र्य अनुभवता आलं.

माझ्या पहिल्याच पुस्तकानं मला खूप नाव मिळालं. शंकर सारडांनी १० उत्तम कादंबऱयांमध्ये ‘मी एक खलाशी’ची निवड केली. पुस्तकाचा विषयच असा होता की नौदलातल्या कुणाच्यातरी हस्ते त्याचं प्रकाशन व्हावं असं मला वाटत होतं. ऍडमिरल भास्करराव सोमण यांना भेटले. ते म्हणाले, ‘पुस्तक वाचायला ठेव. आठ-दहा दिवसात मी येईन की नाही ते सांगेन.’ चारच दिवसात फोन आला त्यांचा, येतो आहे हे सांगायला. ‘सातवे आसमान में’ अशी अवस्था झाली माझी तेव्हा. या पुस्तकामुळे अनेक साहित्यिकांचा सहवास लाभला. आम्ही तेव्हा दुमजली घराच्यावर तिसरा मजला बांधला. ते आमचं गच्चीवरचं घर. दोन फ्लॅट होऊ शकतील अशी मोठ्ठी गच्ची होती ती… जिथे आम्ही नंतर रहायला गेलो. राजाभाऊ गवांदे आमच्या त्या घराला वॉललेस हाऊस म्हणायचे. त्या घरात माझ्या लिखाणाची भरभराट झाली.’

माधवीताईंची ही ठाम धारणा आहे की परमेश्वरानं प्रतिभेचा एक बिंदू दिलेला असतो, जो नंतर विस्तारत जातो आणि लेखकाचा जन्म होतो. अनुभव हा लेखकाचा कच्चा माल असतो असं त्यांना वाटतं. अनुभव हवाच. कारण त्यावरच कल्पनांचे इमले बांधता येतात. अनुभवासाठी भोवताली माणसं हवीत, एकांतवासात राहणाऱयाची लेखणी अस्सल अनुभवापासून दूर राहते आणि मग ती वाचकाला आपली वाटत नाही. माणूस, नातेसंबंध, त्यांची मूल्यधारणा समजून घेताना लिखाण बहरतं. या अनुभवांच्या संस्कारातून अलवार पंखाची वेदना साकारता येते हे माधवीताईंच्या अनुभवसिद्ध लिखाणातूनच सिद्ध झालं आहे. ‘मी ज्या शाळेत शिकवत होते, ते माझं दुसरं घरच होतं. त्या शाळेनं मला अनुभवसमृद्ध केलं. तिथे मुस्लिम, शीख, हिंदू, जैन मारवाडी, अशी सगळी मुलं यायची. जैन मारवाडी, स्वतःला गुजराती समाजापेक्षा वेगळं समजायचे. म्हणून ते आमच्याकडे हिंदी माध्यमातून शिकायचे.

आमच्याकडे शिकणाऱया एका मुलीची मोठी बहीण, खूप सुंदर होती. तिला मॉडेलिंगची ऑफर आली. घरच्यांचा विरोध, म्हणून ती पळून गेली. दुर्दैवानं ती वापरली गेली आणि त्या त्रासाला कंटाळून डिप्रेशनमध्ये गेली. नंतर ती घरी परतली. पण घरी तिला एका खोलीत डांबून ठेवलं गेलं. तिला कोणीही समजून घेतलं नाही. एकदा तिला तिच्या छोटय़ा बहिणीनं माझ्याकडे आणलं आणि मग तिच्याकडून मी जे सत्य ऐकलं. त्यातून ‘सुख पाहता’ या कादंबरीचा जन्म झाला. ८ कादंबऱया, २२ कथासंग्रह, दोन कवितासंग्रह, तीन ललित लेखसंग्रह, ६ अनुवादित पुस्तकं अशी ग्रंथसंपदा निर्माण करत १९ मे २०१८ जी त्यांचं ७४ वं पुस्तक प्रकाशित झालं…

प्रचंड मानसन्मान आणि जोडलेल्या माणसांची नात्यांची श्रीमंती अनुभवत, प्रतिभेच्या पंखांनी वयाच्या सीमारेषा झुगारत, आयुष्याच्या सादाला प्रतिसाद देत, माधवीताई जगतात. म्हणूनच ‘मारिया’सारखी कादंबरी लिहिताना, ख्रिश्चन समाजाचं चित्र हुबेहूब उतरावं यासाठी त्यांच्या घरात, वस्तीत जाऊन राहू शकतात. ‘मान-सन्मान खूप मिळतात, पण वाचकांची पत्र, फोन आणि आता व्हॉटसअप मेसेज जास्त आनंद देतात, हेच माझं अर्जित असतं.’ हे सांगताना त्यांचे डोळे चमकतात. तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कसे बघता, यावर जगणं अवलंबून असतं. हा जगण्याचा दृष्टीकोन आपल्या लेखनातून लोकांना त्या देतात. म्हणूनच ‘महाद्वार उघडताना’ हा त्यांचा मृत्युवरच्याच कथांचा संग्रहसुद्धा जगण्यातली सकारात्मकताच आपल्याला शिकवून जातो.. ‘ज्या घराचं पुढचं दार सदैव उघडं असतं तेच घर असतं’ असं म्हणणाऱया माधवीताईंच्या मनाचं दारही सदैव खुलं आहे, म्हणूनच त्यांचं अनुभवांना अनुभवणं अजूनही सुरू आहे, जे त्यांच्या यशस्वी लेखणीचं गमक आहे.