आंध्र प्रदेशच्या महेंद्रने जिंकली बुद्धिबळ स्पर्धा

आयडियल स्पोर्टस् अॅपॅडमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अखिल हिंदुस्थानी 15 वर्षांखालील मुला-मुलींच्या मोफत ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत गुंटूर-आंध्र प्रदेशचा महेंद्र तेजा मेकला विजेता ठरला. सर्वाधिक साखळी 7.5 गुण नोंदवून महेंद्रने निर्विवादपणे स्पर्धा जिंकली. पुण्याच्या दक्षराज बोलेचे समान साखळी 6.5 गुणांचे आव्हान सरस सरासरीच्या बळावर मागे टाकत चेन्नईच्या अज्जेशने उपविजेतेपद पटकावले. परिणामी दक्षराजला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.

कोरोना नियमावलीचे पालन करून क्रीडापटू चंद्रकांत करंगुटकर यांच्या कार्याचा सुवर्णमुद्रा, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, राजन भोसले व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त लीलाधर चव्हाण यांनी गौरव केला. इन्स्टिटय़ूट फॉर चेस एक्सलंट व मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या सहकार्याने ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कल्याणच्या अरविंद अय्यरने (6 गुण) चौथा क्रमांक, नागपूरच्या दिशांक बजाजने (6 गुण) पाचवा क्रमांक, चेन्नईच्या डी. पी. अभिनवने (6 गुण) सहावा क्रमांक, नरसिंगपूरच्या वैभव नेमाने (6 गुण) सातवा क्रमांक, भुवनेश्वरच्या ओम खडंगने (5.5 गुण) आठव्या क्रमांकाचा रोख पुरस्कार मिळवला. स्विस लीग पद्धतीने साखळी नऊ फेऱयांमध्ये ऑनलाइन लीचेस प्लॅटफॉर्मवर ही स्पर्धा होऊन आंध्र प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामीळनाडूच्या बुद्धिबळपटूंना महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चुरशीच्या लढती दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या