धोनी आता टी-20 वर्ल्डकपही खेळणार! हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनाला माही हवाय

51

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंग धोनीला येत्या टी-20 विश्वचषकापर्यंत थांबशील का, अशी  विनंती केल्यानंतर धोनीने आपल्या निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑस्ट्रेलियात 2020 मध्ये होणाऱया टी-20 विश्वचषकापर्यंत धोनी हिंदुस्थानी संघात असावा अशी इच्छा संघ व्यवस्थापनेनेही व्यक्त केल्याने माहीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय तूर्तास पुढे ढकलल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. न्यूझीलंडने हिंदुस्थानवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. साखळी सामन्यादरम्यान महेंद्रसिंग धोनीला त्याच्या संथ खेळीमुळे टीकेचे धनी व्हायला लागले होते. मात्र कर्णधार विराट कोहलीने वारंवार धोनीची पाठराखण केली होती.

विराट कोहलीच्या मते धोनी अजूनही तंदुरुस्त आहे. त्यामुळे गरज पडल्यास आगामी टी-20 विश्वचषकापर्यंत धोनी संघात खेळू शकतो. ‘‘हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनाला सध्या दुसरा यष्टिरक्षक संघात नको आहे. मात्र आगामी काळात रिषभ पंत हा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून पहिली पसंती असणार आहे. त्यामुळे पंतला मार्गदर्शन करण्यासाठी धोनीने काही काळ संघात राहावे, अशी विनंती संघ व्यवस्थापनाने केली होती. याचसोबत मधल्या काळात जर पंत दुखापतीमुळे खेळू शकला नाही तर धोनी पर्यायी खेळाडू म्हणून त्याची जागा घेऊ शकतो.’’ अशी माहिती सूत्राने प्रसारमाध्यमांना दिली. दरम्यान, हिंदुस्थानच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱयासाठी धोनीची हिंदुस्थानी संघात निवड झालेली नाही. कारण स्वतः धोनीनेच दोन महिने क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय बोर्डाला कळवला होता.

आपली प्रतिक्रिया द्या