महेश भागवत

57

मूळचे आपल्या नगर जिल्हय़ातील, पण सध्या तेलंगणा राज्यात पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले महेश मुरलीधर भागवत यांचा अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. मानवी तस्करी रोखण्यासंदर्भात महेश भागवत यांनी जे उल्लेखनीय कार्य केले त्याचा सन्मान म्हणून २०१७ चा ‘टॅफिकिंग इन पर्सन्स रिपोर्ट हीरो’ (टीपीआर हीरो) हा पुरस्कार अमेरिकन परराष्ट्र खात्यातर्फे त्यांना जाहीर करण्यात आला आहे. मागील दीड दशकांपासून  भागवत हे मानवी तस्करांविरोधात खंबीरपणे उभे आहेत. मानवी तस्करी, विशेषतः मुली आणि महिलांची होत असल्याने भागवत यांचे हे कार्य महिला सुरक्षा आणि सन्मान या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे ठरते. अनेकदा बालकांची, कामगारांचीदेखील तस्करी केली जाते. याही टोळय़ांचा बीमोड भागवत यांनी केला. अशा सुमारे चारशे बालकांना त्यांनी वीटभट्टीच्या कामावरून मुक्त केले आणि शालेय जीवनाचा त्यांचा अधिकार त्यांना बहाल केला. सध्या ज्या रचाकोंडा पोलीस क्षेत्रात ते कार्यरत आहेत, तेथेही त्यांनी वेश्या व्यवसाय करणारी हॉटेल्स, निवासी इमारतींमध्ये सुरू असणारे अनेक कुंटणखाने बंद केले. फक्त पोलिसी खाक्या न दाखवता स्वयंसेवी संस्था, नागरी संघटना यांच्या मदतीने हे कार्य करतात. त्यामुळे या कारवाईचे परिणाम सकारात्मक होतात. सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतलेले महेश भागवत नंतर आयपीएस झाले आणि त्यांना मणिपूर-त्रिपुरा केडर मिळाले. नंतर आंध्र प्रदेश केडरमध्ये काम करताना त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न अशा दोन्ही पातळय़ांवर काम केले. त्या दृष्टिकोनातून त्यांनी ‘अज्ञात स्वेच्छा’ हा उपक्रम राबवला. ‘मी कौसम’, ‘मैत्री संघम’ या उपक्रमांच्या माध्यमातून नागरिक आणि पोलीस यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला. मानवी तस्करीतून सुटका केलेल्या पीडित महिला अनेकदा नंतर अनिश्चितता आणि अस्थैर्याच्या भोवऱयात सापडतात आणि पुन्हा त्याच व्यवसायात परततात. भागवत यांनी अशा महिला वा-यावर सोडल्या जाणार नाहीत, त्यांना उपजीविकेची स्वावलंबी साधने उपलब्ध होतील, याचीही खबरदारी घेतली. त्या महिलांच्या मुलींच्या शालेय शिक्षणाचीही सोय केली. चोख पोलिसी कर्तव्य अनेकजण बजावतात, पण त्यासोबतच सामाजिक भान ठेवून आपल्या प्रशासकीय पदाचा व अधिकारांचा त्यासाठी कौशल्याने वापर करून अनेक पीडितांना नवे जीवन देणारे महेश भागवत यांच्यासारखे अधिकारी विरळाच.

आपली प्रतिक्रिया द्या