रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार महेश नाटेकर यांच्याकडे

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा प्रभारी पदभार आज महेश नाटेकर यांनी स्विकारला. कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर रोहन बने यांनी मंगळवारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यापुर्वी जिल्हा परिषदेच्या सर्व सभापती आणि पंचायत समिती सभापतींनी राजीनामे दिले आहेत.

सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. रोहन बने यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देताच अध्यक्षपदाचा पदभार उपाध्यक्ष महेश नाटेकर यांच्याकडे आला. महेश नाटेकर यांनी आज प्रभारी अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला. प्रभारी अध्यक्षपद स्विकारल्यानंतर जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी महेश नाटेकर यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी अध्यक्ष रोहन बने, जि़.प़.सदस्य उदय बने, विनोद झगडे, माजी सभापती अजित नारकर, विविध खात्यांचे प्रमुख, कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

प्रभारी अध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्यानंतर महेश नाटेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शिवसेना पक्षामुळेच मला सुरुवातीला तालुकाप्रमुख, नंतर जि.प.सदस्य, उपाध्यक्ष आणि आता प्रभारी अध्यक्षपदाची संधी मिळाली. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत, पालकमंत्री अ‍ॅड.अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यामुळे मला उपाध्यक्ष आणि प्रभारी अध्यक्षपदाचे कामकाज करण्याची संधी मिळाली. प्रभारी अध्यक्षपदाच्या मिळालेल्या कालावधीत ज्या कामांना प्राधान्य द्यायचे आहे ती कामे तातडीने करणार. तसेच जिल्ह्याच्या विकासाची कामे करणार असल्याचे नाटेकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या