वरळी डेअरीच्या मुख्य लिपिकाला मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. महेश सपकाळे असे त्याचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाचे मानधन काढण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सपकाळे याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून सरकारकडून त्यांच्या पगाराचे बेसिक मानधन मिळणार होते. ते मानधन मिळावे यासाठी त्यांनी सपकाळे याच्या कार्यालयात अर्ज केला होता. ते मानधन काढण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच दिल्याशिवाय मानधन काढले जाणार नाही याची त्यांना खात्री झाली. त्यानंतर तक्रारदार याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची दखल घेत सापळा रचून सपकाळेला लाच घेताना रंगेहाथ पकडले.