महिला बचत गटांना पाणी बिलात सवलत मिळणार, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरवणाऱया महिला बचत गटांना आता पाणी बिलात सवलत मिळणार आहे. पालिका सभागृहात आज याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. शिवसेनेने यासाठी पाठपुरावा केला होता.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुंबईतील विविध महिला बचत गटांमार्फत ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर शालेय पोषण आहार पुरवला जातो. मात्र या महिला बचत गटांसाठी पालिकेकडून करण्यात येणारी जलआकारणी व्यावसायिक दराने करण्यात येते. या व्यावसायिक पाणी आकारणीमुळे महिला बचत गट नाराज होते. शालेय पोषण आहार तयार करताना येणारा खर्च तसेच हा आहार शाळेत पोहोचवण्यासाठी येणारा खर्च धरला तर त्यातून मिळणारे उत्पन्न खूप कमी असते. मात्र विद्यार्थ्यांना चांगला आहार देता यावा, यासाठी बचत गटांची धडपड असते. अशा परिस्थितीत बचत गटांना पाणी बिल व्यावसायिक दराने आकारले जाते. त्या पार्श्वभूमीवर हा व्यावसायिक दर रद्द करून राज्य सरकारच्या अन्नपूर्णा आहार योजनेच्या धर्तीवर पालिका शाळांमध्ये शालेय आहार पुरवणाऱया महिला बचत गटांना सवलतीचा दर आकारावा तसेच याआधी तोडलेल्या पाण्याच्या जोडण्या पुन्हा जोडल्या जाव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या दहिसर पूर्वमधील नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी केली होती. याबाबतचा प्रस्ताव सभागृहात मंजूर केल्यामुळे बचत गटांना दिलासा मिळाला असून पाणी बिलात सवलत मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या