महिंदा राजपक्षे चौथ्यांदा श्रीलंकेचे पंतप्रधान; छोटा भाऊ असलेल्या राष्ट्रपतींनी दिली शपथ

1112

महिंदा राजपक्षे हे चौथ्यांदा श्रीलंकेचे पंतप्रधान बनले आहेत. राजधानी कोलंबोतील ऐतिहासिक राजामहा विचार्या बौद्ध मंदिरमध्ये रविवारी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. 74 वर्षीय महिंदा यांना त्यांच्याहून तीन वर्षांनी छोटा असलेला भाऊ, राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी पंतप्रधान पदाची शपथ दिली. नंतर गोतबाया यांनी पंतप्रधान बनलेल्या थोरल्या बंधूच्या चरणांना स्पर्श केला आणि दोघांनी गळाभेट घेतली.

श्रीलंकेत 5 ऑगस्टला लोकसभेची निवडणूक पार पडली होती. यात राजपक्षे बंधूंच्या श्रीलंका पीपुल्स पार्टीने (एसएलपीपी) 225 पैकी 145 जागांवर शानदार विजय मिळवला, तर त्यांच्या मित्र पक्षांनी पाच जागांवर झेंडा फडकवला. प्रचंड बहुमताच्या जोरावर राजपक्षे बंधूंनी सत्तेवरची पकड आणखी मजबूत केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोतबाया यांनी एकतर्फी विजय मिळवला होता. महिंदा यांनी लोकसभा निवडणुकीत विजयाचा तोच धडाका राखत स्वत: 5 लाखांहून अधिक मते मिळवली. श्रीलंकेच्या निवडणूक इतिहासात एका उमेदवाराला मिळालेले हे सर्वाधिक बहुमत ठरले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या