महिपतगडाचे बुरूज ढासळू लागले

76

सामना ऑनलाईन, संगमेश्वर

शिवकालीन इतिहासाची साक्ष देत सह्याद्रीच्या माथ्यावर निधड्या छातीने ऊन, वारा, पावसाचा सामना करीत उभ्या असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील दोन शिवकालीन गड किल्ल्यांना अद्यापही विकासाची प्रतीक्षा आहे. छत्रपतींच्या नावे राजकारण करणाऱ्यांना या गडांचे ढासळते बुरूज दिसत नसल्याने आगामी काळात हे किल्ले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

संगमेश्वर तालुक्याच्या पूर्वेला सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेला प्रचीतगड हा सह्याद्रीचा मुकुटमणी म्हणून प्रसिद्ध आहे. तालुक्यातील नेरदवाडी आणि शृंगारपूर अशा दोन ठिकाणांहून या गडावर जाता येते. अतिउंच आणि जाण्यास धोकादायक असलेला गड असतानाही वर्षभर येथे ये-जा करणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. गडावर बारमाही अस्तित्वात असलेले थंडगार पाणी आणि स्वयंभू भवानीमातेचे मंदिर यामुळे येथे पश्चिम महाराष्ट्रातून पाटणमार्गे येणाऱया भाविकांची संख्या मोठी आहे. सद्यस्थितीत गडावर असलेल्या तळ्यांची अवस्था बिकट झाली आहे. एवढ्या वर्षात त्यांची साफसफाई झाली नसतानाही या तळ्यांमधील पाणी मात्र तसेच आहे. गडावरील सात दरवाज्यांचा घोडेतलाव सर्वांचे आकर्षण आहे. याचीही अवस्था सध्या बिकट आहे. गडाचे प्रवेशद्वार ढासळत निघाले आहे. गडावर जाणारी शिडी धोकादायक बनली आहे. गडाचा एकेक बुरूज आजघडीला ढासळू लागला आहे. येथील शिवकालीन तोफाही जमिनीवर पडून आपल्या अस्तित्वाची केवळ साक्ष देत आहेत.

संगमेश्वर तालुक्यातील दुसरा गड म्हणजे महिपतगड म्हणजेच महिमानगड कुंडी आणि निगुडवाडीच्या दरम्यान वसलेला हा गड तालुक्याच्या पश्चिमेकडील बाजूस येतो. या गडावर २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट या दिवशी स्थानिक ग्रामस्थ झेंडावंदन करतात. चढण्यास अत्यंत सोपा आणि अबालवृद्धांनाही सहज जाता येईल अशा या गडाची अवस्थाही बिकट आहे. येथील बुरूज ढासळु लागले आहेत. गडावर शिवकालीन तोफा पडून आहेत. भवानीमाता आणि मारूती मंदिर वगळता उर्वरित मंदिरे अखेरच्या घटका मोजत आहे. येथील घोडेतलाव पार बुजून गेला आहे. प्रवेशव्दाराजवळील तळे आणि गुहासुद्धा पडून राहिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या