म्हैसाळमधील धक्कादायक घटना, एकाच कुटुंबातील 9 जणांची विष पिऊन आत्महत्या

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे वनमोरे कुटुंबातील नऊजणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने सांगली जिल्हा हादरला आहे. पोपट वनमोरे यांच्या घरात चिठ्ठी व विषाची बाटली सापडली असून, त्यातून आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल. असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी संशयित आठ खासगी सावकारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बँकेचे कर्ज, सावकारीचा जाच यामधूनच वनमोरे कुटुंबीयांनी सामुदायिक विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोपट वनमोरे हे शिक्षक व त्यांचा भाऊ माणिक वनमोरे हे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत.

गुप्तधनाचे आमीष?

वनमोरे कुटुंबीयांना कुणीतरी गुप्तधनाचे आमिष दाखविले होते. तसेच, माणिक वनमोरे यांनी अनेकांकडून पैसे घेऊन गुप्तधन दाखविणाऱ्याला पैसेही दिल्याची व माणिक वनमोरे यांनी काही ठिकाणी मला तीनशे कोटी मिळणार असल्याचे बोलून दाखविले असल्याचीही चर्चा सुरू होती.

पोपट वनमोरे, संगीता वनमोरे, शुभम वनमोरे, अर्चना वनमोरे, माणिक वनमोरे, रेखा वनमोरे, आदित्य वनमोरे, प्रतिक्षा वनमोरे, अक्काताई अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.