जाऊ देवाचिया गावा!

447

<ज्योत्स्ना गाडगीळ>

आपण तीर्थक्षेत्रांना भेट देतो ते नवस फेडण्यासाठी, नाहीतर यात्रेसाठी! मात्र महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे ही केवळ अध्यात्मिक केंद्रे नाहीत तर ती उत्तम पर्यटन स्थळेसुद्धा आहेत. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत अशाच काही तीर्थक्षेत्रांना भेट देता येईल. पर्यटनाचा हेतू साध्य होईल, वैभवशाली महाराष्ट्राचे दर्शन होईल आणि पुढच्या पिढीलाही तीर्थक्षेत्राची ओढ निर्माण होईल. महाराष्ट्रात अनेक धार्मिक स्थळे आहेत.

हरिहरेश्वर

उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकांची पावले कोकणात वळतात. येथे अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. एक म्हणजे ‘दक्षिण काशी’ या नावाने ओळखले जाणारे ‘हरिहरेश्वर’. महादेवाच्या वास्तव्याने पवित्र झालेले हे स्वर्गीय ठिकाण मुंबईपासून अंदाजे २०० कि.मी. अंतरावर आहे. कोकणातल्या या गावाला समुद्रकिनाराही लाभला आहे. हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र असल्याने इथे भक्तगणांची गर्दी कायमच… नारळी-पोफळींनी गच्च भरलेले हे गाव अतिशय स्वच्छ, सुंदर आणि शांत आहे. जवळपास सर्वच घरी राहण्याची आणि पारंपरिक कोकणी जेवणाची सोय उपलब्ध आहे. पोळी, भाजी, आमटी, भात आणि दर दिवशी समुद्रातून आलेल्या ताज्या मासळीचा पदार्थ जेवणाच्या ताटाला परिपूर्ण बनवतो. साहसप्रेमींसाठी समुद्रात नौकाविहार आणि स्कुटर्सचा पर्याय उपलब्ध आहे. तर दिवेआगरजवळचा ‘मदगड’ हा गिर्यारोहकांना खुणावतो.

श्री गणपतीपुळे

रत्नागिरी जिह्यात समुद्रकिनारी श्रीगणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. शिवछत्रपतींच्या आणि पेशव्यांच्या कालखंडात येथील मंदिराचे बांधकाम झाले आहे. लांबलचक समुद्रकिनाऱयावर हे अत्यंत सुंदर मंदिर असल्यामुळे हा परिसर खूपच आकर्षक वाटतो. तिथे अनेक भक्तनिवास, धर्मशाळा, तसेच उत्तम हॉटेलची सुविधा आहे. तिथे घरगुती जेवणही उत्तम मिळते.

नरसोबाची वाडी

कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर श्री क्षेत्र नृसिंहवाडी वसलेले आहे. या स्थानास तपोभूमी असेही म्हणतात. कृष्णा नदीच्या तीरावर औदुंबराच्या वृक्षाच्या छायेखाली श्री नृसिंह सरस्वती मंदिर आहे. मंदिरात पादुकांच्या रूपात श्रीदत्तात्रेय भगवंतांचे वास्तव्य आहे. नरसोबाच्या वाडीचे पेढे, कवठाची बर्फी आणि बासुंदी प्रसिद्ध आहे. कोल्हापूरहून ४० कि.मी. तर सांगलीतून पंचवीस कि.मी. अंतरावर नरसोबाची वाडी आहे. जयसिंगपूर रेल्वे स्टेशनपासून अवघ्या १५ कि.मी.वर वाडी आहे.

पैठण

पैठण हे शहर संभाजीनगर जिह्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. संत भानुदास, मुक्तेश्वर, एकनाथ असे श्रेष्ठ संत पैठणमध्ये होऊन गेले. तिथे संत एकनाथांचे समाधी मंदिर आहे.  पैठणी साडय़ांच्या उत्पादनासाठीही पैठण ओळखले जाते. म्हणजेच पर्यटनाबरोबर अस्सल पैठणीची खरेदीही करता येणार आहे. पैठण हे संभाजीनगरपासून ५६ किलोमीटर अंतरावर आहे.

श्री भीमाशंकर, पुणे

देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी पुण्याजवळील भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. येथील ज्योतिर्लिंगामधून भीमा नदीचा उगम होत असल्यामुळे हे स्थान खूप पवित्र आहे. मंदिराचे शिखर खूपच सुंदर असून सभामंडप प्रशस्त आहे. मंदिर परिसरात दीपमाला आढळतात. भीमाशंकरचा परिसर अभयारण्य म्हणून घोषित केलेला आहे. भीमाशंकर परिसरातील नागफणी, कोकणकडासारखी ठिकाणे पर्यटकांना नेहमीच साद घालतात. पावसाळ्यामध्ये भीमाशंकरला जाण्याची मजा काही औरच असते. पुण्यातील आंबेगाव तालुक्यात राजगुरूनगरपासून ६० कि.मी. अंतरावर, सह्याद्रीच्या कुशीत भीमाशंकर आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या