मालकिणीचा घरकाम करणारीवर चाकू हल्ला, काम नीट करत नसल्याचा आरोप

694

गुजरातमधल्या अहमदाबाद येथील वासना भागामध्ये एका महिलेला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या महिलेच्या हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. उपचारानंतर मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचं नाव प्रीतीकुमारी राम (25 वर्षे) असल्याचे कळाले. तिच्या तक्रारीवरून मालकिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रीती ही मूळची बिहारमधल्या दानापूरची रहिवासी आहे. ती 4 वर्षांपासून वासना भागातील तिच्या मालकिणीच्या घरात राहात होती. धरणीधर पुलाजवळ असलेल्या जयदीप टॉवरमध्ये तिची मालकीण कल्याणी, तिचा नवरा शंतनू सिंह आणि शंतनूची आई सुषमादेवी राहात होते. प्रीतीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की रविवारी कल्याणीने तक्रार करायला सुरुवात केली की प्रीती नीट काम करत नाही.

कल्याणीने थोड्यावेळात उग्रावतार धारण करत आदळआपट करायला सुरुवात केली आणि प्रीतीला शिवीगाळ करत मारायला लागली. रागाच्या भरात कल्याणेने स्वयंपाकघरात पडलेला चाकू उचलला आणि प्रीतीवर हल्ला केला. प्रीतीने बचाव करण्यासाठी हातांची ढाल केली. यामुळे चाकू तिच्या हाताला लागला. तिने कसाबसा घरातून पळ काढला आणि रस्त्यावरील लोकांकडे मदत मागितली. तिची अवस्था पाहिल्यानंतर लोकांनी अँम्ब्युलन्स बोलावली आणि तिला रुग्णालयात नेले. प्रीतीच्या डाव्या हाताला जखम झाली असून कल्याणीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या