वडकी खूनप्रकरणी मुख्य सूत्रधारास अटक

31

लोणी काळभोर – हवेली तालुक्यातील वडकी येथे १९ डिसेंबर रोजी झालेल्या खूनप्रकरणी मुख्य सूत्रधारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हांडेवाडी येथून जेरबंद केले. जमिनीच्या वादातून चुलतभावानेच खुनाची सुपारी दिली होती. याप्रकरणी माजी महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाडसह नऊजणांना अटक केली आहे.

पप्पू ऊर्फ सुनील दत्तात्रय गायकवाड (रा. वडकी, तळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी खून झाल्याच्या दिवशी पोलिसांनी माजी महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाडसह सहाजणांना अटक केली. मात्र, नंतर तपासात यामध्ये आणखी आरोपी असल्याचे समोर आले. यातून मेघराज विलास वाहळे (वय २३, रा, भुकूम, खाटपेवाडी, ता. मुळशी), शंकर विजय भिलारे (वय २४, रा. कर्वेनगर, साईबाबा मंदिरासमोर, पुणे. मूळ वरवडे, ता. आंबेगाव), दत्तात्रय महादेव पाडाळे ( वय २३, रा. म्हाळुंगे, ता. हवेली) या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता जमिनीच्या वादातून चुलतभावानेत खून केल्याचे समोर आले. मृत शिवाजी दामोदर गायकवाड यांचा चुलतभाऊ पप्पू ऊर्फ सुनील दत्तात्रय गायकवाड हा तेव्हापासून फरार होता.

या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरीमकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, रवी शिनगारे या विशेष पथकाची नेमणूक केली होती. पथकाने वडकी, शिरूर, सासवड, कात्रज, सातारा रोड या भागात वेशांतर करून फरार पप्पू गायकवाडची शोधमोहीम सुरू केली. पोलीस हवालदार महेश गायकवाड व नीलेश कदम यांना पप्पू गायकवाड हा २८ डिसेंबर रोजी हांडेवाडी चौक येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. याआधारे पोलिसांनी सापळा रचला. पप्पू गायकवाड हा तोंडाला रूमाल बांधून हांडेवाडी चौकात येताना दिसला. पोलीस असल्याचे समजताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्यास जेरबंद केले. पप्पू गायकवाड यास चौकशीसाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या गुन्ह्यात आणखी कोण सहभागी आहे का, याची माहिती घेण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या