शिक्षणातल्या विकासाची शाळा

90

सुवर्णा क्षेमकल्याणी, [email protected]

आज आपण प्रगत तंत्रज्ञान असलेल्या युगात जगतोय. सगळ्या सुखसोयींनी युक्त अशा समाजात वावरतोय, पण याच समाजात आजही असा एक घटक आहे ज्याला साधं शिक्षण घेण्यासाठीही खूप कष्ट घ्यावे लागतात. अशा गरीब, बेताची परिस्थिती असलेल्या अनाथ गरजू विद्यार्थ्यांसाठी झटणाऱया किशोर जगताप यांच्या कार्याची ही माहिती…

समाजात आपल्या आजूबाजूला अनेक उपेक्षित घटक असतात, ज्यांच्याकडे सर्वसामान्य लोकांचे लक्ष जात नाही. पण याच सर्वसामान्य लोकांमधून एखादा असामान्य माणूस या उपेक्षितांचा वाली होतो, आपलं सर्वस्व पणाला लावून काम करतो. असंच एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे बागशाळा चालवणारे किशोर जगताप.

मराठी माणसाच्या विकासासाठी , मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचारासाठी ते प्रामुख्याने कार्यशील आहेत. याशिवाय शिक्षण हा त्यांच्या कार्याचा मूळ पाया आहे. समाजात प्रत्येकाला शिक्षण मिळायला हवं या दृष्टीने किशोर जगताप यांचे प्रयत्न सुरू आहेत. मराठी भाषा सगळ्यांच्या लेखनात आणि मुखात असावी यासाठी १९८४ पासून ते मराठी भाषा निःशुल्क शिकवीत आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचं त्यांचं स्वप्नं आहे. याच उद्देशातून त्यांनी ‘विद्यार्थी भारती संघटने’ची स्थापना केली. विद्यार्थी भारती संघटना मराठी भाषेचं संवर्धन आणि जनजागृती करते. या संघटनेच्या प्रयत्नांमुळे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेत परीक्षा देणं शक्य झालं. १०० हून अधिक स्वयंसेवी कार्यकर्ते या संघटनेमार्फत आपलं योगदान देत आहेत.

आज आपण प्रगत तंत्रज्ञान असलेल्या युगात जगतोय. सगळ्या सुखसोयींनी युक्त अशा समाजात वावरतोय, पण याच समाजात आजही असा एक घटक आहे ज्याला साधं शिक्षण घेण्यासाठीही खूप कष्ट घ्यावे लागतात. अशा गरीब, बेताची परिस्थिती असलेल्या अनाथ गरजू विद्यार्थ्यांसाठी, किशोर जगताप स्वतः बागशाळा चालवतात. फुटपाथ, सार्वजनिक बागा यांचा वापर करून गरजू विद्यार्थ्यांना ते मोफत शिक्षण देत आहेत. या बागशाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेताहेत. एक माणूस गेली अनेक वर्षं सातत्याने हे काम करतोय आणि अनेकांना याचा लाभ होतोय ही खरेच उल्लेखनीय गोष्ट आहे. इथे शिक्षण घेणाऱया सगळ्या विद्यार्थ्यांचे हे ‘किशोर दादा’ वेगवेगळी गणिती सूत्रे, विज्ञानातल्या वेगवेळ्या संकल्पना, नियम सोप्या भाषेत कवितेच्या माध्यमातून शिकवतात. ज्या विद्यार्थ्यांना खाजगी क्लास लावणं शक्य नसतं अशा १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना किशोर सर शिकवतात मार्गदर्शन करतात. त्यांच्या सगळ्या शंकांचं इथे समाधान होते, असे इथले विद्यार्थी सांगतात. शिवाय एखादी क्लिष्ट संकल्पना सोप्या भाषेत शिकवण्याच्या हातोटीमुळे किशोर जगताप सर सगळ्या विद्यार्थ्यांचे लाडके आहेत, इतकेच नाही तर खाजगी क्लासची उणीवही त्यांना भासत नाही. हे सगळं सुरळीत सुरू असताना किशोर दादांचा अचानक अपघात झाल्यामुळे जागोजागी जाऊन शिकवणं त्यांना शक्य होत नव्हतं आणि यातूनच ‘मैत्रकुल’ची संकल्पना अस्तित्वात आली.

मैत्रकुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निवासी अभ्यास केंद्र उपलब्ध होणार आहे. संकल्पना डोक्यात आल्यावर पुढचे प्रयत्न सुरू झाले, अखेरीस कल्याणजवळच्या बापगाव इथे जागा मिळाली आणि सर्वसाधारण बांधकाम झाले असले तरीही मैत्रकुलसाठी आवश्यक सामानाची जमवाजमव, आर्थिक मदत इत्यादी साठीही प्रयत्न सुरू आहेत. काहीजण इथे व्यक्तिगत स्वरूपात देणगी देतात तर काही जण आवश्यक सामग्री पुरवतात अशा रीतीने मैत्रकुलची सर्व बाजूने उभारणी होतेय. बऱयाचदा कला क्षेत्र निवडणाऱया विद्यार्थ्यांना घरातून विरोध होतो, अशा विद्यार्थ्यांना ‘मैत्रकुल’च्या रूपाने एक उत्तम मार्गदर्शक मिळणार आहे. यासाठी त्यांची त्या त्या क्षेत्राशी निगडीत चाचणी घेतली जाईल आणि त्यांनतर त्यांना आवश्यक ती सगळी मदत पुरवली जाईल असं मैत्रकुलच्या संचालिका सांगतात. याशिवाय काही विद्यार्थ्यांना करीअर निवडताना योग्य दिशा मिळत नाही तर अशांनाही इथे मार्गदर्शन केले जाते. इथली विशेष बाब म्हणजे मैत्रकुलच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी वयाची अट नाही. ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण इथे घेता येऊ शकते. सध्या ३० विद्यार्थ्यांची सोय या निवासी केंद्रात करण्यात आली आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळायला हवं, त्याच्या आवडीनुसार त्याचं क्षेत्र त्याला निवडता यावं आणि एकूणच प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा हेच मैत्रकुलचं स्वप्नं आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपणही खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो, तेव्हा नक्कीच ‘मैत्रकुल’ला भेट द्या आणि आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या जाणीवेने शक्य असेल तितकी मदत करूया.

 

आपली प्रतिक्रिया द्या