घरोघरी तपासणी, चार दिवसांत अंमलबजावणीला जोर, एक हजार इमारतींमध्ये निर्बंध कडक

कोरोना रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात 15 सप्टेंबरपासून राबवण्यात येणारी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम मुंबईतही पालिकेच्या माध्यमातून काटेकोरपणे राबवण्यात येत आहेत. यामध्ये घरोघरी भेटी-तपासणी वेगात सुरू असून गेल्या फक्त चार दिवसांत कोरोना रुग्ण आढळल्याने सुमारे एक हजार इमारती-इमारतींचे भाग सील करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत एकूण सील इमारतींची संख्या 9 हजार 665 वर पोहोचली आहे. 18 सप्टेंबर रोजी 24 तासांत कोरोनाबाधितांच्या 20 हजार 751 ‘क्लोज काँटॅक्ट’चा विक्रमी शोध घेऊन कार्यवाही करण्यात आली.

मुंबईत आटोक्यात आलेली रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने पालिकेने कठोर उपाययोजना आणि प्रभावी उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार मुंबईत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. यामध्ये मुंबईत 40 लाख घरांपर्यंत पोहोचून सर्वेक्षण आणि जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पालिकेची अधिकारी-कर्मचाNयांसह पाच हजार जणांची टीम कार्यरत आहे. या टीमध्ये एक पालिकेचा कर्मचारी आणि दोन स्वयंसेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण-तपासणी करीत आहेत. यामध्ये रुग्ण आढळणारी इमारत-इमारतीचा भाग तातडीने सील करून कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. यानुसार 15 ते 18 सप्टेंबरपर्यंत केवळ चार दिवसांत 902 इमारती-इमारतीचे भाग सील करण्यात आले आहेत. दरम्यान, लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर नागरिकांचा वाढलेला बेजबाबदारपणा रुग्णसंख्या वाढण्यास कारणीभूत असून कोरोना चाचण्यांचीही संख्या वाढल्यामुळेही जास्त रुग्ण नोंद होत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अशी होतेय कार्यवाही
– मुंबईत 14 सप्टेंबर रोजी 8637 इमारती सील तर झोपडपट्ट्या चाळींमध्ये 564 कंटेंनमेंट झोन होते. यामधील सील इमारतींच्या संख्येत मोठी वाढ होत असून सील इमारतींची संख्या 18 सप्टेंबर रोजी तब्बल 9665 वर गेली आहे. यामध्ये पालिकेच्या सुधारीत नियमानुसार एकाच इमारतीत 10 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्यात येत आहे. र्
– चाळी-झोपडपट्ट्यांपेक्षा इमारतींमध्येच जास्त रुग्ण आढळत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कारण चार दिवसांत सील इमारतींची संख्या 902 इतकी वाढली असली तरी चाळी-झोपडपट्ट्यांमधील कंटेनमेंट झोनची संख्या 8 इतकी कमी झाली आहे. 15 सप्टेंबर रोजी मुंबईत 592 कंटेनमेंट झोन होते. 18 सप्टेंबर रोजी ही संख्या 585 वर आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या