भीमा-नीरा नदीजोड प्रकल्पातील बोगदा कोसळून ८ मजुरांचा मृत्यू

78

सामना ऑनलाईन । पुणे

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील अकोले येथे नीरा भीमा नदीजोड प्रकल्पातील बोगद्याचे बांधकाम सुरू असताना बोगदा कोसळून ८ मजुरांचा मृत्यू झाला आहे. बोगद्यातून बाहेर येताना क्रेन उलटल्याने हा अपघात झाल्याचे माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली काही मजूर अडकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिमा- निरा नदीजोड प्रकल्पांतर्गत तावशी ते डाळज येथे १५० मीटर खोल बोगदा तयार करण्यात येत आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास बोगद्यातील काम संपल्यानंतर ८ कामगार क्रेनमधून वर असताना वायररोप तुटला. त्यामुळे क्रेन उलटून क्रेनमधील कामगार २०० फूट खोल बोगद्यामध्ये कोसळले. यावेळी अपूर्णावस्थेत असणारे बांधकाम कोसळल्याने ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखआली आणखी काही अडकल्याची भीती आहे. मृतांमध्ये उत्तरप्रदेश, ओडिसा, आंधप्रदेश या राज्यातील कामगारांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नीरा-भीमा नदी जोड प्रकल्पाचे काम तावशी ते डाळज या २४ किलोमीटर अंतराच्या सहा टप्प्यात जलदगतीने सुरू आहे. नीरा नदीच्या तावशी येथून उजनी धरणाच्या डाळज पर्यंत बोगद्याद्वारे नदी जोड प्रकल्पाचे काम अकोले,काझड, डाळज या ठिकाणी तीन ठिकाणी सुरू आहे. कामासाठी तीनशे कामगार काम करीत असून जेसीबी मशीन, मालवाहतूक करण्यासाठीची वाहने यांच्या मदतीने काम सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या