सरन्यायाधीशांची मोठी घोषणा; प्रादेशिक भाषांमध्ये मिळणार सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, 26 जानेवारी रोजी हजारों निवाडे होणार जारी

हिंदुस्थानचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी घोषणा केली की eSCR (इलेक्ट्रॉनिक सुप्रीम कोर्ट रिपोर्ट्स) आता देशातील विविध प्रादेशिक भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रदान करेल. हे फीचर प्रजासत्ताक दिनानिमित्त लॉन्च केले जाईल.

ई-एससीआर प्रकल्प सर्वोच्च न्यायालयाने 2 जानेवारी 2023 रोजी नवीन वर्षात राष्ट्राला समर्पित केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांची डिजिटल आवृत्ती अधिकृत कायद्याच्या अहवालात – ‘सुप्रीम कोर्ट रिपोर्ट्स’ मध्ये नोंदवली जाते त्या पद्धतीने प्रदान करण्याचा हा एक उपक्रम होता.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी लॉन्चिंगची घोषणा करताना सांगितले-

‘आमच्याकडे eSCR आहे ज्यात आता 34000 निकाल आहेत आणि एक लवचिक शोध सुविधा आहे. आमच्याकडे आता प्रादेशिक भाषांमध्ये 1091 निवाडे आहेत जे उद्या प्रजासत्ताक दिनी लाँच होणार आहेत. आमच्याकडे ओडियामध्ये 21, मराठीत 14, आसामीमध्ये 4, 1 गारोमध्ये, कन्नडमध्ये 17, खासीमध्ये 1, मल्याळममध्ये 29, नेपाळीमध्ये 3, पंजाबीमध्ये 4, तामिळमध्ये 52, तेलुगूमध्ये 28 आणि उर्दूमध्ये 3 आहेत. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निकाल शेड्यूल भाषांमध्ये देण्याच्या मिशनवर आहोत. आम्ही आधीच सुरुवात केली आहे. प्रजासत्ताक दिनी जारी केले जातील.’