‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी हाफिज सईदच्या घराजवळ बॉम्बस्फोट; 2 ठार, 17 गंभीर जखमी

हिंदुस्थानसाठी मोस्ट वॉन्टेड असलेला दहशतवादी आणि लश्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याच्या घराजवळ बुधवारी बॉम्बस्फोट झाला. यात दोन लोकांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट एवढा भीषण होता की यामुळे आजूबाजूच्या घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या आणि वाहनांचेही नुकसान झाले. याबाबत पाकिस्तानी टीव्ही चॅनेल ‘जिओ न्यूज’ने वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, हाफिज सईद याच्या घराजवळ हा बॉम्बस्फोट झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला असून 17 गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना लाहोरच्या जिन्ना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्फोटात 6 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

या स्फोटानंतर पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुजदर यांनी चौकशीचे आदेश दिले असून अहवाल मागवला आहे. स्फोटानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सिल केला असून तपास सुरू केला आहे. सुरुवातीच्या तपासानंतर स्फोटोवेळी हाफिज सईद घरात उपस्थित नव्हता असे समोर आले आहे. परंतु या स्फोटामागील कारण स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने पार्किंगमध्ये वाहन उभे केले आणि त्यानंतर हा स्फोट झाला अशी माहिती दिली आहे. लाहोर पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या