आयसीसीच्या निव्वळ उत्पन्नात बीसीसीआयचा सिंहाचा वाटा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नवीन उत्पन्नाचे मॉडेल तयार केले आहे. 2024 ते 27 दरम्यानच्या या उत्पन्नाच्या सायकलमध्ये हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) मोठा वाटा असणार आहे. ‘आयसीसी’ला या सायकलमध्ये जवळपास 600 मिलियन डॉलर्स वार्षिक उत्पन्न मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यातील सर्वाधिक 38.5 टक्के हिस्सा हा ‘बीसीसीआय’ला मिळणार आहे. म्हणजेच ‘बीसीसीआय’ला दरवर्षी 230 मिलीयन डॉलरहून (1887 कोटी रुपये) अधिक कमाई होणार आहे.

पाकिस्तान बोर्ड चौथ्या स्थानी

या प्रस्तावित ‘आयसीसी’ उत्पन्नाच्या मॉडेलनुसार ‘बीसीसीआय’ ही सर्वाधिक कमाई करणारा बोर्ड ठरणार आहे. यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाला 41.33 मिलियन अमेरिकन डॉलर किंवा 6.89 टक्के इतका वाटा मिळेल. ‘आयसीसी’च्या कमाईतील तिसरा सर्वात जास्त वाटा असलेली क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 37.53 मिलियन अमेरिकन डॉलर किंवा 6.25 टक्के वाटा मिळणार आहे. याचबरोबर चौथ्या स्थानी असलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 34.51 अमेरिकन डॉलर किंवा 5.75 टक्के वाटा मिळणार आहे.

सहसदस्यांना 11.19 टक्के वाटा

 ‘आयसीसी’च्या एकूण निव्वळ उत्पन्नापैकी 88.81 टक्के वाटा हा 12 पूर्ण सदस्य असलेल्या क्रिकेट संघटनांना मिळणार आहे. असोसिएट (सह) सदस्यांना 11.19 टक्के वाटा मिळणार आहे. यातील वर्षाची एकूण रक्कम ही ‘आयसीसी’च्या कमाईवर अवलंबून आहे. ही जवळपास 3.2 बिलियन डॉलर असू शकते.