‘झी स्टुडिओज’चे निखिल साने ‘व्हायकॉम १८’मध्ये

86

सामना ऑनलाईन । मुंबई

सैराट, चि. व चि. सौ. का, कट्यार काळजात घुसली, टाईमपास, एलिझाबेथ एकादशी, नटरंग अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या झी स्टुडिओजला एक मोठा हादरा बसला आहे. झी स्टुडिओजच्या मराठी चित्रपटांचं व्यवस्थापन पाहणारे निखिल साने यांनी ‘झी’ला अलविदा केलं आहे. यापुढे साने ‘व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स’चे बिझनेस हेड म्हणून काम पाहणार आहेत.

ब्रँडइक्विटी या वेबसाईटने हे वृत्त दिलं आहे. ‘व्हायकॉम १८’ ही संस्था प्रादेशिक भाषा, बॉलिवूड आणि हॉलिवूडसाठी चित्रपट निर्मिती करते. या संस्थेचा आता मराठी चित्रपट निर्मिती करण्याचा मानस आहे. त्यामुळे त्यांनी निखिल साने यांची निवड आपले बिझनेस हेड म्हणून केली आहे.

‘व्हायकॉम १८’च्या सूत्रांनुसार, प्रादेशिक भाषांमध्ये मराठी या भाषेत अनेक उत्तम संहिता आणि दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होते. त्यामुळे मराठी भाषेत चित्रपट निर्मिती करण्यासाठी ही कंपनी उत्सुक आहे. निखिल साने यांचा मराठी चित्रपट व्यवसायाचा अनुभव तसेच चित्रपटाच्या संहितेची असलेली उत्तम जाण यांमुळेच त्यांची निवड आम्ही केली, असं व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्सचे अजित अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या