नगरमध्ये वर्षात 770 अपघातांत 374 जणांचा बळी

रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसागणिक वाढतेच आहे. यातही जीवघेण्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवून पादचाऱयाला धडक देऊन पळून जाण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. जिह्यासह शहरात गेल्या वर्षभरात 770 अपघातांच्या घटनांमध्ये ‘हिट ऍण्ड रन’मध्ये 374 जणांचा बळी गेला असून, 281 जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांसह संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. मात्र, अपघातांना आळा घालण्यात अद्यापि हवे तसे यश मिळाले नसून, अपघातांमध्ये मोठी वाढ होत आहे. वाहनाची धडक देऊन पळून जाणाऱयांवर कोणाचाच ‘वॉच’ नसल्याचे चित्र आहे. अशा अपघातात निरपराध पादचाऱयांचे हकनाक बळी जात आहेत.

नगर शहरासह जिह्यात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे आहे. महामार्गांमुळे नगरकरांचा प्रवास सुखाचा झाला आहे. परंतु, भरधाव वेगाने वाहने चालवून निरपराध वाहनचालकांना धडक देऊन पळून जाणाऱयांची संख्या मोठी आहे. गेल्या वर्षभरात 770 वाहनांच्या धडकेत 374 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 281 जण गंभीर जखमी झाले, तर 115 जण किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच 770 अपघातांमध्ये दोन हजार 632 वाहनांचे नुकसान झाले आहे.

अपघातांची आकडेवारी

मृत्यू         374

गंभीर जखमी  281

किरकोळ जखमी      115

एकूण        770

मयत, जखमींना अशी मिळते मदत

 अपघातात मृत्यू झालेल्या किंवा जखमींना सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. गुन्हा दाखल झाल्यानंतर अपघाती कोर्टात आर्थिक मदतीसाठी दावा दाखल करावा लागतो. अपघातात मृत्यू झालेल्या मयताच्या वारसांना दोन लाख रुपयांपर्यंत मदत केली जाते. गंभीर जखमींसाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत मदत केली जाते. मात्र, अपघातात मयत किंवा जखमींच्या वाहनाचा विमा काढलेला असणे गरजेचे असते.

284 वाहनांचा लागेना थांगपत्ता

 अपघाताची घटना घडल्यानंतर पळून जाणाऱयांची संख्या मोठी आहे. पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी काहीजण घटनास्थळावरून पळ काढतात. वाहनाला धडक देऊन पळून जाणाऱया 284 वाहनांचा शोध पोलिसांना अजूनही लागलेला नाही. ‘हिट ऍण्ड रन’च्या गुह्यांचा तपास करत असताना पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. घटनास्थळावरून पळून गेलेल्या वाहनचालकांचा शोध सीसीटीव्ही, प्रथमदर्शनींनी दिलेल्या माहितीवरून पोलीस घेतात. परंतु, काही वाहनांवर असलेल्या नंबरप्लेट चुकीच्या असतात, त्यामुळे वाहनचालकाचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान असते.