कुछ मिठा हो जाए

शेफ मिलिंद सोवनी

आपल्या तिळगुळाव्यतिरिक्त इतर गोड पदार्थ संक्रांतीनिमित्त…

आज संक्रांत… त्यामुळे काहीतरी गोड खाण्यासाठी दोन नव्या रेसिपीज दिल्या आहेत. पहिली आहे पंजाबी स्टाईलचा गाजरचा हलवा… ही रेसिपी घेण्याचं कारण म्हणजे सध्या दिल्लीच्या गाजरांचा सिझन आहे. म्हणून मुद्दाम त्या गाजरची रेसिपी सिलेक्ट केली आहे. संक्रांत म्हटलं म्हणजे सगळेच पदार्थ तिळाचे आणि गुळाचे नको म्हणून जरा वेगळ्या प्रकारची ही रेसिपी दिली आहे. आजचा दिवस हा काहीतरी गोड खाण्याचा आहे म्हणून गाजराचा हलवा दिलाय. संक्रांत असल्यामुळे दोन्ही पदार्थ व्हेजच ठेवले आहेत. आत्ता गाजरांचाच सिझन आहे. पंजाबी स्टाईलची असल्यामुळे गाजरचा हलवा बनवण्याची ही पद्धत थोडीशी वेगळी असते. कारण त्यात मावा वगैरे घातलेला असतो. म्हणून ती पंजाबी स्टाईलची.

दुसरी रेसिपी फ्युजनसारखी आहे. त्यात बेसिकली चायनिज आणि हिंदुस्थानी यांचं मिश्रण आहे असं म्हणता येईल. तीसुद्धा साधारण गोडच रेसिपी आहे. पण त्यात तिळाचा वापर केला आहे. त्यात नारळ, तीळ, साखर असं स्टफिंग आहे. हे सर्व पदार्थ मराठी लोकांनाही आवडतं. ते मुद्दाम येथे घेण्यात आलंय. नारळ आणि तीळ यांचा समावेश असलेला हा रोल आहे… यात मी मेन्शन केलंय की बाहेरचं आवरण असतं त्या आवरणाचा पॅनकेक बनवावा लागतो त्यात अंडे घालावे लागते. बेसिकली हा थंडीचा सिझन आहे. गूळ किंवा तीळ हे पदार्थ उष्ण असतात. थंडीच्या दिवसांत ते बॉडी वॉर्म ठेवायला कामाला येतात.

पंजाबी स्टाईल गाजरचा हलवा

साहित्य – दहा मध्यम आकाराची गाजरे, एक कप दूध, चार चमचे शुद्ध तूप, दहा काजूंचे तुकडे, दोन चमचे मनुका, एक कप साखर, एक कप खवा फेटलेला, वेलची पावडर अर्धा चमचा.

कृती – जाड तळाच्या पॅनमध्ये तीन चमचे तूप गरम करून त्यात गाजरे टाका. तीन ते चार मिनिटे ही गाजरे परतून घ्यायची. मग त्यात दूध घालून ते दिसेनासे होऊन गाजरे शिजेपर्यंत मंद आचेवर सहा ते सात मिनिटे ठेवा. दरम्यान राहिलेले तूप दुसऱया पॅनमध्ये गरम करून त्यात काजूचे तुकडे आणि मनुके तळून घ्या. काजूचे तुकडे गुलाबी झाले की ते बाजूला काढून ठेवा. गाजरे असलेल्या मिश्रणात साखर घाला आणि शिजू द्या. साखर वितळेपर्यंत हे मिश्रण सतत ढवळत राहायचे. मग त्यात खवा आणि वेलची पावडर टाकायची. नीट ढवळून घ्यायचे आणि पुन्हा तीन ते चार मिनिटे शिजू द्यायचे. मग त्यात बाजूला ठेवलेले काजूचे तुकडे आणि मनुका घालून आणखी दोन मिनिटे शिजवा. गाजराचा हा हलवा गरमागरम खायला द्यायचा.

तीळ आणि नारळाचे रोल

साहित्य – (पॅनकेकसाठी) पीठ १०० ग्रॅम, कॉर्नफ्लॉवर ५० ग्रॅम, एक अंडे, मीठ चवीपुरते. (सारणासाठी) अर्धा नारळ किसलेला, तीळ एक चमचा, काजूचे तुकडे २ चमचे, साखर 8८० ग्रॅम, फॅट तळण्यासाठी.

कृती – सर्व साहित्य एकत्र करून घुसळून पिठासारखे मळून घ्यायचे. नंतर नॉन स्टीक पॅन गॅसवर ठेवून त्यात या मिश्रणापैकी अर्धे मिश्रण ओतायचे. पॅन वाकडे करून मिश्रण पॅनच्या सगळ्या बाजूंना लागले पाहिजे. त्यानंतर एक ते दोन निमिटे ते शिजू द्यायचे. नंतर ते बाजूला काढून ठेवायचे. मग त्यात साखर, किसलेला नारळ आणि तीळ घालून मंद आचेवर शिजवा. साखर पूर्णपणे वितळेपर्यंत मिश्रण ढवळत राहायचे. मग बाजूला ठेवलेल्या पॅनकेकमध्ये हे मिश्रण ओतून ते दुमडून घ्यायचे. त्यानंतर हे रोल तेलात गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचे. मग त्याचे छोटे छोटे त्रिकोणी तुकडे करून मध किंवा आईक्रीमबरोबर वाढावे.

आपली प्रतिक्रिया द्या