नवी जुनी स्वप्नं…

>>प्रतिनिधी

मकरंद देशपांडे, प्रमोद पवार, अदिती पोहनकर… दोन दिग्गज आणि एक नवोदित असा नव्या-जुन्यांचा मिलाफ आपल्या भेटीला येतो आहे…

आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ नाटय़ आणि सिने अभिनेते प्रमोद पवार यांनी दिग्दर्शित केलेला ‘ट्रकभर स्वप्न’ हा सिनेमा. मराठी, हिंदी, इंग्रजी नाटक, मालिका, सिनेमा अशा सर्व माध्यमात आघाडीवर असलेले लेखक, दिग्दर्शक, अभिनेता मकरंद देशपांडे, तर दाक्षिणात्य सिनेमाचा अनुभव असणारी नवोदित अभिनेत्री अदिती पोहनकर यांच्या अभिनयाची चुणूक लवकरच प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

या सिनेमाच्या दिग्दर्शनाच्या अनुभवाविषयी प्रमोद पवार सांगतात, 1982 साली टिळक-आगरकरांच्या निमित्ताने विश्राम बेडेकर यांच्या संपर्कात आलो होतो. त्यानंतर राजदत्त, विजया मेहता या सगळ्या दिग्गजांकडे केलेल्या कामाचा अनुभव गाठीशी धरून आता वयाच्या साठीत हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. लोकांच्या स्मरणात राहील असा एक सिनेमा करायचा होता. त्यासाठी मला बीएसटीचे असिस्टंट कमिशनर किरण, दिघावकर यांनी मला मोलाची मदत केली.प्रविण तरडे यांनी पटकथा संवादाला मदत केली. नितीन देसाईंचंही पाठबळ लाभलं त्यामुळे माझ्या स्वप्नापेक्षा या चित्रपटाने माझं स्वप्न मोठं केलं. जे आता प्रत्यक्षात उतरलंय. सगळ्या कलाकारांनी साथ दिली. राजीव जैन, प्रशांत खेडेकर या सिनेमॅटोग्राफकर यांनी मला हवी ती दृष्य साकारण्यासाठी सहकार्य केलं. इतरांकडून कामं करवून घेण्याचा सिनेमाच्या दिग्दर्शनाचा अनुभव हा या सिनेमामुळे पहिल्यांदाच मला मिळाला. मकरंद देशपांडे आणि क्रांती रेडकर असे दिग्दर्शनाचा अनुभव असलेले कलाकार यामध्ये काम करत आहेत. आता लोकांनी हे काम बघावं त्यांची प्रतिक्रिया माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे.

मुंबईसारख्या स्वप्ननगरीत एक शेतकरी आपल्या पत्नीसोबत येतो. मुलं मोठी झाल्यावर घरात पोटमाळा बांधणं अशी समान्य भेडसावणारी समस्या त्यालाही भेडसावते. आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी बायको धुणीभांडी करते आणि तो टॅक्सी चालवतो. आपली नैतिक मूल्य राखून कुटुंबाचा विकास कसा साधतो?, चांगला नवरा, चांगला वडीलाची भूमिका निभावताना त्याला आलेल्या अडचणींचं चित्रण माझ्या व्यक्तिरेखेत मी साकारतोय, असे नाटय़ अभिनेता मकरंद देशपांडे सांगतात.

दाक्षिणात्य आणि मराठी सिनेमांमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती पोहनकर या चित्रपटात काजल नावाची व्यक्तिरेखा साकारतेय. खूप गोड, निरागस अशा मुलीची व्यक्तिरेखा करतेय. तिची अनेक स्वप्न आहेत. यामध्ये तिला एक छोटासा टेपरेकॉर्डर हवा असतो. कारण गणपतीच्या मंडपात तिला नाचायचं असतं. त्यासाठी ती बाबांकडे हट्ट करते. या चौकोनी कुटुंबात मुलाला बॅरिस्टर व्हायचंय आणि मुलीला नर्तिका व्हायचंय. काजल वयात आलीय. त्यामुळे तिच्या घरातील समस्या, झोपडपट्टीत राहात असल्यामुळे आजूबाजूला असलेल्या मुलांच्या, पुरुषांच्या वासनांध नजरांचा करावा लागणारा सामना या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. शिवाय आपल्या छोटय़ाशा कुटुंबात रमणाऱया काजलला आजूबाजूच्या परिस्थितीची काहीही जाणीव नाही. त्यामुळे  एकमेकांशी असलेले भावनिक बंध जपणारी, प्रेमाच्या आधारावर आलेल्या अनेक मोठय़ा वादळांना हे कुटुंब कसं सामोरं जातं. त्यासाठी मुलीला बारमध्येही नृत्य करावं लागतं, अशा प्रकारे एक वेगळाच चेन्ज ओव्हर असलेली व्यक्तिरेखा या सिनेमात साकारत असल्याचे अदिती पोहनकर सांगते.

कुटुंबासोबत प्रेक्षकांनी बघावा असा हा सिनेमा आहे. कुटुंब एकत्र राहिलं की, ते कोणत्याही वादळाला सामोरं जाऊ शकतात. अशी अगदी मध्यमवर्गीयांची गोष्ट त्यांना याद्वारे उलगडेल, असे ती ‘ट्रकभर स्वप्न’विषयी वाटते. काहीशा विश्रांतीनंतर हिंदीतही काम करण्याचा विचार असल्याचे ती सांगते. सध्या मराठीतील चेतन चिटणीस आणि मनोज कोटियन यांच्या सिनेमाचं काम सुरू आहे.

मराठीत आपलेपणा वाटतो

मराठी आणि इतर भाषिक सिनेमात काम करण्याचा अदितीला अनुभव आहे. याविषयी तिचे मत आहे की, मराठी माझी भाषा आहे. त्यामुळे मराठीत काम करताना एक वेगळीच मजा येते. सादरीकरणही सोपे वाटते. इतर भाषेत पाठांतर करून संवाद बोलावे लागतात. तरीही हा नवीन शिकण्याचा अनुभव आहे. नवीन संस्कृतीचीही ओळख झाली. चाळीस दिवसांत एकेका सिनेमाचं चित्रीकरण करण्याचा अनुभव फारच अनोखा आहे.

नाटक अधिक भावतं

इंग्रजी, मराठी नाटकांपैकी जास्त काय भावतं ? असे विचारता मकरंद देशपांडे सांगतात, नाटक जास्त भावतं, कारण तिथे सगळं जिवंत घडत असतं. सिनेमा कितीही गाजला तरी तो रेकॉर्डेड आहे. पुन्हा पाहिला की जुना होतो. पण नाटक कितीही जुनं असलं तरीही त्यातला कलाकार काम करताना रंगमंचावर दिसतो. प्रेक्षकही तिथेच असतात. त्यामुळे सगळं जिवंत समोरासमोर घडतं. विशेष म्हणजे सगळ्यातच खरेपणा असतो.