
राज्यातील आदिवासी आश्रम शाळेतील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना कायम करा, या मागणीासठी या कामगारांनी काढलेला बिऱ्हाड मोर्चा आज मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे. नाशिक येथून मंगळवारी निघालेल्या या मोर्चात आश्रम शाळेतील कामगार आपल्या बिऱ्हाडासह सहभागी झाले आहेत.
आज मोर्चेकरी कसारा घाटातून खाली आले असून ते उद्या पुढील प्रवासासाठी मार्गक्रमण करणार आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी कामगाराचा बिऱ्हाड मोर्चा १४ ऑक्टोबर २५ रोजी नाशिक येथून मुंबईकडे निघाला. शनिवारी मोर्चेकरी कसारा घाटात आले आहेत. त्यांनी घाटातच मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर मुक्काम केला. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला.
आज मोर्चेकरी कसारा घाट उतरून खाली आले. त्यांनी घाटाच्या पायथ्याला मुक्काम केला. मुक्कामाच्या ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलन करत शासनाचा निषेध केला. या मोर्चासाठी कसारा घाटात ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपविभागीय पोलीस अधीक्षक् मिलिंद शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी संदीप गिते, कसारा पोलीस निरीक्षक सुरेश गावीत, इंगतपुरी पोलीस निरीक्षक सारिका आहिरराव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .
बाह्यस्रोत भरती रद्द करण्याची मागणी
आंदोलकांनी बाह्यस्त्रोत एजन्सीद्वारे केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेला कडाडून विरोध केला असून ही भरती रद्द करण्याची मागणी केली आहे. काही कामगारांना प्रशासनाने विनाकारण कामावरून कमी केले आहे. त्या कामगारांना पुन्हा कामावर घेतले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे. मोर्चाचे नेतृत्व ललित चौधरी हे करीत आहेत.




























































