रंगरंगोटी – बुजुर्गांच्या सहवासात

1271

>> नंदू वर्दम

आज रंगभूषा शिकविण्यासाठी बर्‍याच संस्था असल्या तरी ही कला आत्मसात करण्यासाठी लागते मेहनत, सराव आणि त्यातून मिळणारा अनुभव.

मी मूळचा कुडाळचा. दहावी झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईला आलो.  माझे काका बाबा वर्दम हे व्ही. शांताराम यांच्याकडे राजकमल स्टुडिओत काम करायचे. पूर्वीच्या काळी मेकअपचे रंग स्वतः बनवावे लागत असत. मलाही रंगांचं आकर्षण होतंच. त्यांच्याकडून ही कला मी शिकलो.

रंगभूषा ही अशी कला आहे की, ज्यामध्ये एखाद्या तरुण कलाकाराला वृद्ध आणि वृद्धाला तरुण दाखवता येऊ शकते,  त्यांचे मित्र कृष्णा बोरकर. तेही खूप चांगले रंगभूषाकार होते. त्यांच्याकडे ‘हे बंध रेशमाचे’ हे नवीन नाटक आलं होतं. त्यामध्ये अरविंद देशपांडे, रामदास कामत हे  कलाकार होते. या नाटकापासून नाटकातील कलाकारांची रंगभूषा करण्यास माझी सुरुवात झाली. क्रायलॉन, डर्मा या कंपन्यांचे मेकअपचे रंग आम्ही वापरतो. शिवाय बफर ब्रशने मेकअप करतो. रंगभूषा ही प्रत्यक्ष काम केलं तर त्याचा अनुभव मिळतो. मेहनत, सराव होतो. तरच उत्तम रंगभूषाकार होता येते. फक्त प्रशिक्षणापुरती ती मर्यादित नाही.

सिनेमा, नाटक, मालिका या प्रत्येक क्षेत्रात काम करताना वेगवेगळे अनुभव येतात. ज्येष्ठ कलाकार प्रभाकर पणशीकर  यांच्या ‘इथे ओशाळला मृत्यू’ यामध्ये कुलदीप पवार संभाजीचं काम करायचे. पणशीकरांसाठी बनियनला फाउंडेशन लावून आम्ही टक्कल तयार केलं होतं. ‘गुंतता ह्रदय हे’ या नाटकासाठी काशिनाथ घाणेकर यांची रंगभूषा करायचो. फैयाज, आशा काळे, सतीश दुभाषी अशा काही कलाकारांची ‘प्रेमशस्त्र’, ‘बेइमान’ , ‘कट्यार काळजात घुसली’, ‘मदनाची मंजिरी’ या नाटकांसाठी फारच वैशिष्टय़पूर्ण रंगभूषा साकारल्या आहेत. सध्या ‘कुसुम मनोहर लेले’ या नव्या नाटकासाठीही रंगभूषा करत आहे.  ‘बटाट्याची चाळ’ नाटकासाठी पुलंची रंगभूषा करणे म्हणजे दरवेळी एक वेगळाच अनुभव असायचा. त्यांच्याकडे जाणं म्हणजे आम्हाला जरा भीती वाटायची, पण ते मात्र आपुलकीने ‘नंदू, चल मेकअप करूया’ असं म्हणायचे. त्यांची जास्त नाटकं पुण्यात बालगंधर्वला व्हायची. त्यांची वैयक्तिक खोली असायची. तिथे रंगभूषाकारालाही जायला वाव असे.   सुनीताताई सगळी देखरेख करायच्या. त्या सगळ्यांची खूप काळजी घ्यायच्या. आमची राहण्याची, खाण्याची सगळी व्यवस्था चोख असायची.  निघताना प्रेमाने ‘‘तिकीट काढून देऊ का?’’ असंही विचारायचे. या नाटकापासूनच माझी खर्‍या रंगभूषा कलेच्या प्रवासाला सुरुवात झाली असं मी म्हणेन.

नव्या रंगभूषाकारांना सांगेन की, तुम्ही कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका. कारण त्यामुळे तुमच्याच भविष्याला धोका आहे. आपण ज्यांची रंगभूषा करतो ते कलाकार आपल्याला नमस्कार करतात. हा आदर फक्त तुमचा नसून तुमच्या कलेचाही आहे हे लक्षात घ्या. मनापासून काम करा. नक्कीच यश मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या